| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २८ जानेवारी २०२५
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पुर्णत्वास नेण्याची जबाबदारी जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची आहे. मात्र, सोमवारी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी बोलावलेल्या महापालिकेच्या आढावा बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत एक शब्दही चर्चा झाली नाही. आ. सुरेशभाऊ खाडे आणि महापालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बासणात गुंडाळला का? असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे.
सोमवारी आ. सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहरातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मिरज शासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीत घेतली. शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेची आहे. रस्ता कामात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, शहरी बस स्थानक व मुख्य बस स्थानक, मिशन हॉस्पिटल, प्रोग्रेस स्कुल, शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंत हटविण्याबरोबरच काही मिळकतधारकांचे नुकसान भरपाईचा विषय प्रलंबित आहे. अंदाजपत्रका प्रमाणे २२ मीटर रस्त्यामधील अतिक्रमण काढून देण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अनेक वेळा महापालिकेशी पत्रव्यवहार केला मात्र, प्राधिकरणाच्या पत्रांना महापालिका केराची टोपली दाखवत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुध्दा अंग काढून घेत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम अतिशय संथगतीने होत आहे.
या प्रमुख विषयावर आढावा बैठकीत एक शब्दही चर्चा झाली नाही. म्हणजे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बासणात गुंडाळला का? हे एकदा जाहीर करावे अशी मागणी मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी यांनी केली आहे. यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष राजेद्र झेंडे, संतोष जेडगे, समन्वयक शंकर परदेशी, असिफ निपाणीकर, अभिजीत दाणेकर, नरेश सातुपते, वसीम सय्यद, सलीम खतीब, तौफिक देवगिरी आदी उपस्थित होते.