yuva MAharashtra दहावीच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख ? संभाजी ब्रिगेडचे अलर्ट मोडवर, दिला शासनाला कडक इशारा !

दहावीच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख ? संभाजी ब्रिगेडचे अलर्ट मोडवर, दिला शासनाला कडक इशारा !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १९ जानेवारी २०२५

दहावीच्या हॉल तिकीट वरील जात आम्ही खपवून घेणार नाही, अन्यथा आम्हाला मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांची जात काढावी लागेल, अशा कडक शब्दात इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिला आहे. शिक्षण विभागामार्फत दहावीच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मुळात हे अत्यंत निषेधार्ह आहे. पुरोगामी महाराष्ट्रात राज्याच्या कानाकोपऱ्यात जाती-जातीमध्ये प्रचंड वाद निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शिक्षण विभागाचा हा निर्णय चुकीचा असल्याचे मत शिंदे यांनी पत्रकार परिषदेमधून व्यक्त केले आहे.

याबाबत टीका करताना संतोष शिंदे म्हणाले की, राज्याच्या शिक्षण विभागामार्फत दहावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी असलेल्या हॉल तिकीट वर जातीचा उल्लेख केला जाणार आहे. शिक्षण विभाग आता विद्यार्थ्यांची जात काढणार का ? असा सवाल करून ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर जात असतेच. शाळेतील विद्यार्थी गुण्यागोविंदाने शिक्षण घेत आहेत. यावेळी लहानपणापासून शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपल्या मित्राची जात कोणती ? हे विद्यार्थी कधीच विचारत नाहीत. मग विनाकारण त्यांच्या मनात सात पेरणीची कारण काय ? शिक्षण विभागामार्फत सांगितले जात आहे की, या हॉल तिकीट वरील जातीमुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मुळात विद्यार्थ्यांकडे हे हॉल तिकीट किती दिवस असते ? मग त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होऊ शकतो ? असा सवाल करून शिंदे म्हणाले की, शिक्षण विभागाच्या डोकं फिरलंय, शिक्षणमंत्र्यांचे डोकं फिरलंय की हे सरकारच डोकं फिरलेलं आहे ? असा संतप्त सवाल केला आहे.


संतोष शिंदे यांनी ही नवीन आणलेली संकल्पना तात्काळ बंद करण्याचे आव्हान दिले असून, हा निर्णय लागू करण्यापूर्वी मराठवाडा विदर्भात फिरा. तेथे कशा पद्धतीने जाती-जातीत विष पेरले जाते आहे हे पहा. प्रत्येक ठिकाणी जातीवाद केला जात आहे. आणि आता शासनाच्या वतीने अधिकृतरित्या कोणी जातिवाद करत असेल तर संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही, वेळ पडल्यास आम्हाला सोमवारी (उद्या) शिक्षण विभागाच्या संचालकांची जात विचारायला यावं लागेल, आम्हाला शिक्षण मंत्री केव्हा प्रसंगी मुख्यमंत्र्यांची ही जात विचारावी लागेल असा कडक इशारा संतोष शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत दिला आहे.