| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ जानेवारी २०२५
मिशन चौक येथील वानलेस हॉस्पिटल अंतर्गत सुरू असलेल्या बायसिंगर लायब्ररीमध्ये सालाबादप्रमाणे ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनतर्फे पत्रकार दिन आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे नियोजन नेटक्या पध्दतीने करण्यात आले होते. सुरुवातीस सर्व पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुध्दे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली सिव्हिलचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम हे उपस्थित होते. याशिवाय सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना शिंदे (शिंदे गट) यांची उपस्थिती होती.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी शाहीन शेख यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकात शाहीन शेख यांनी पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकार म्हणजे काय, त्यांनी काय केले पाहिजे याविषयी मनोगत व्यक्त करून संघटनेच्या कार्याबद्दल माहिती दिली आणि पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पत्रकारांनी ब्लॅकमेलिंग करणे, बदनामी करणे यापासून पत्रकारांनी दूर राहिले पाहिजे. समाजातील उपेक्षित प्रश्नांना वाचा फोडून शासन दरबारी मांडले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
सांगली पोलीस मुख्यालयातील सायबर क्राईमचे करण परदेशी व अभिजीत पाटील यांनी सायबर क्राईमपासून नागरिकांनी कसे सावध राहिले पाहिजे व त्याकरिता आपण कोणती सुरक्षितता बाळगली पाहिजे याविषयी त्यांनी समोर प्रोजेक्टर लावून सखोल मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनात त्यांनी निनावी कॉल येणे, मोबाईल वरती बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करून माहिती विचारणे, पोलीस, ईडी, पोलीस प्रमुख असल्याचे भासवून माहिती विचारणे, वीज बिलाबाबत निनावी माहिती देवून, मॅसेज टाकून कनेक्शन कट करणे विषयी भलावणी करून नागरिकांना भुलविणे, मोबाईलवरती ऑनलाईन पैसे भरण्यास सांगणे, त्यामधून फ्रॉड करून सर्व अकौंट मोकळे करणे, मोबाईल हॅक करणे तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम आदी वेगवेगळ्या ऍप्सवरून माहिती विचारणे, सेक्सटॉर्शन करणे, मोठमोठ्या व्यक्ती असल्याचे भासवून, सेम पोलीस अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओद्वारे कॉल करणे, तुमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे, मोठ्या व्यवहारांचेवर लक्ष ठेवून लाखो रुपये हॅक करून हडप करणे, त्यांना अटक करण्याचे सांगून पैसे उकळणे, त्यांना भिती घालणे, सर्व कुटुंबाला अटक करणे आदी भयानक प्रकारांची भिती दाखवून सायबर क्राईम करणे तसेच मनी लॉंड्रिंगद्वारे लोकांना फसविणे याबाबतची सखोल माहिती श्री. करण परदेशी यांनी दिली. सदरचा कार्यक्रम ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर असोसिएशनने चांगला उपक्रम राबल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.
यावेळी २०२५ चे प्रगत हिंदुस्थान, अमन एक्सप्रेस आणि भूमीभूषण या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुध्दे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या अल्प आयुष्यात तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारितेबद्दल केलेल्या महान कार्याची सखोल माहिती दिली. आजचा हा पत्रकारितेचा दिन म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी प्रथम मराठी वृत्तपत्रक सुरू केल्याची तारीख आहे. ही तारीख म्हणजेच आपण सर्वजण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. ६ जानेवारी १९३२ रोजी प्रथम त्यांनी दर्पणकार म्हणून मराठी वृत्तपत्र सुरू केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना सुमारे १० भाषा अवगत होत्या. त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीतही पत्रकारिता सुरू करून लोकांना वाचनास प्रवृत्त केले. ते अत्यंत हुशार होते. जाभेकर यांनी पत्रकाराशिवाय इतर अनेक कामे केली आहेत. शिवाय त्यांना इंग्रजांनीही त्यांना आपल्या पदरी नोकरीस ठेवले होते इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती सांगून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनतर्फे अनेक मान्यवरांना तसेच वंचित, उपेक्षित गुणवंतांना दरवर्षी ६ जानेवारी दिवशी पुरस्कार दिला जातो. सालाबादप्रमाणे याही वर्षी हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. पुरस्कार पुढीलप्रमाणे- जीवन गौरव पुरस्कार श्री. यशवंत कुंभार (नाना), सांगली यांना आणि ज्येष्ठ संपादक बाळासाहेब शिंदे मिरज यांना देण्यात आला. तर आदर्श उद्योजक म्हणून श्री. संभाजी पाटील, सांगली यांना देण्यात आला. धन्वंतरी पुरस्कार सांगली सिव्हिलचे डीन डॉ. विक्रमसिंह कदम, होमिओपॅथीचे डॉ. सुभाष भिडे, सांगली, तसेच डॉ. महेश शहा, सांगली यांना देण्यात आला. तज्ञ विधीज्ञ ऍड. बाळासाहेब वाघमोडे, सांगली, ऍड. ऋतुजा रामचंद्र दुधाळ, सांगली, ऍड. सनी साळुंखे यांना देण्यात आला. आदर्श फोटोग्राफरचा पुरस्कार श्री. विशाल सागरे, मिरज, श्री. रविंद्र काळेबेरे, सांगली यांना देण्यात आला.
वृत्तपत्र विक्रेता म्हणून श्री. प्रकाश भोसले सांगली, श्री. शशिकांत गोविंद पाटील तानंग, श्री. संजय ईश्वर जेऊर, जत यांना देण्यात आला. उत्कृष्ट डिटीपी ऑपरेटरचा पुरस्कार श्री. गणेश पाटील, सांगली यांना दिला तर उत्कृष्ट निवेदक म्हणून सौ. जयश्री जाधव, सांगली व प्रा. राणी शिवाजी यादव, सांगली यांना देण्यात आला. क्रिएटिव्ह संपादक श्री. मकरंद बुरांडे वारणा कडोली यांना देण्यात आला. श्री. सुनील सत्याप्पा पाथरवट यांना विशेष गौरव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर आदर्श इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा पुरस्कार सर्फराज सनदी सांगली यांना तसेच शंकर देवकुळे माधवनगर सांगली यांना आणि गणेश आवळे मिरज यांना देण्यात आला. तसेच विक्रांत पांडुरंग लोंढे मिरज (हिरकणी न्यूज) यांचा आदर्श इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा पुरस्कार देण्यात आला. आदर्श सामाजिक कार्याचा सन्मान श्री. नंदकुमार ऊर्फ नाना मुरलीधर कनवाडकर, सांगली आणि श्री. संतोष (नाना) खामकर जयसिंगपूर यांचा करण्यात आला. श्री. सुनील पाटील, जयसिंगपूर यांना आदर्श प्रकाशन संस्था हा सन्मान देण्यात आला.
शेवटी आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव प्रगत हिंदुस्थानचे संपादक दिपक ढवळे यांनी मानले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विराटशक्तीचे संपादक विजयकुमार पोतदार कवठेपिरान, सांगली जिल्हाध्यक्ष व संदेश लहरीचे संपादक जे. वाय. पाटील, महान नेताचे संपादक शाहीर खराडे, ग्रामवार्ताचे संपादक राहुल मोरे, भूमिभूषणचे संपादक मारुती नवलाई, स्वतंत्र माहिती अधिकारचे संपादक शाहीन शेख, तिरंगा आणि कुंभोजकर ऑफसेटचे मालक व राज्याचे उपाध्यक्ष शशिकांत कुंभोजकर, सारांश मासिकाचे आणि संस्थेचे महाराष्ट्र पश्चिमचे अध्यक्ष संपादक अनिल दबडे, कुंभशिल्पचे संपादक व महापालिका क्षेत्राचे शहराध्यक्ष नित्यानंद कुंभार, घरप्रमुखचे संपादक व संस्थेचे खजिनदार धोंडीराम (आण्णा) शिंदे, मिरज हेरॉल्ड चे संपादक बाळासाहेब शिंदे, आदेश अहिल्याचा चे संपादक ईश्वर हुलवान, जागृत जीवन संदेशचे संपादक सुधाकर पाटील, नोकरी न्यूजचे सहसंपादक सार्थक पाटील, पंकज नाईक, जिनदासचे सहसंपादक यश ढवळे, विजय हुपरीकर, चंद्रकांत गायकवाड, अमन एक्सप्रेसच्या संपादिका आणि संस्थेच्या जिल्हा सचिव पिंटी कागवाडकर, साप्ताहिक दर्पणकारचे संपादक सूर्यकांत कुकडे, साप्ताहिक अर्थराज्यचे संपादक व पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष अल्ताफ खतीब, लंकेश कांबळे आपले व्यासपीठचे संपादक, वास्तव दर्पणचे संपादक मकरंद बुरांडे, प्रगत हिंदुस्थानच्या सहसंपदिका संगीता ढवळे, फोटोग्राफर सागर घाडगे, प्रेस फोटोग्राफर चंद्रकांत माळी, वार्ताहर सलीम शेख, वार्ताहर अनिल पाटील, वार्ताहर विश्वजीत पाटील, वार्ताहर अनिल दडगे, वार्ताहर धनंजय शिंदे, नवसंदेश आप्पा तसेच इस्लामपूर येथील संघटनेचे पदाधिकारी विश्वनाथ पवार तसेच याशिवाय पत्रकार क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी बायसिंगर लायब्ररीचे व्यवस्थापक प्रफुल्ल कांबळे यांचा मोलाचे सहकार्य लाभले.