| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २७ जानेवारी २०२५
महाराष्ट्राचे चित्ररथ प्रत्येक वर्षी कर्तव्यपथावर लक्ष वेधून घेतात आणि अनेकदा पुरस्कार जिंकले आहेत. दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे योगदान खास होते, ज्यांनी वेगवेगळ्या थीमवर आधारित चित्ररथ तयार करून महाराष्ट्राला प्रतिष्ठा मिळवून दिली. १९७१ ते २०२३ या कालावधीत महाराष्ट्राने उत्कृष्ट चित्ररथासाठी १४ वेळा पुरस्कार प्राप्त केले आहेत. आणि ही गोष्ट महाराष्ट्रवासियांसाठी अभिमानाची मानली जाते. या चित्ररथातून ही संस्कृती, परंपरा आणि प्रगती यांचे प्रतिबिंब दिसून येते.
तथापि, यंदाच्या वर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर दिसला नाही, याबाबत अनेकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र यंदा कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्र दिसून आला नाही, याचे कारण केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयामध्ये आहे. दरवर्षी, मंत्रालयाच्या निर्णयानुसार काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची निवड कर्तव्यपथाच्या पथसंचलनासाठी केली जाते, आणि प्रत्येक राज्याला तितकेच प्रतिनिधित्व मिळावे, म्हणून दरवर्षी काही राज्य वगळले जातात. यंदा महाराष्ट्रालाही वगळण्यात आलेले राज्य म्हणून ठेवले गेले आहे.
सामान्यत: कर्तव्यपथावर २६ चित्ररथ सहभागी होतात, त्यामध्ये १० मंत्रालयांचे रथ आणि १६ राज्यांचे रथ असतात. यासाठी तीन वर्षांतून एकदा सर्व राज्यांचा समावेश केला जातो, जेणेकरून सर्वांना समान संधी मिळू शकते. यावर्षी, महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर दिसला नाही, कारण तो वगळण्यात आलेल्या राज्यांमध्ये होता.
हे बदल दरवर्षी होतात, जेणेकरून विविध राज्यांचे सांस्कृतिक योगदान साजरे केले जाऊ शकते. त्यामुळे या बदलात राजकीय कारण नसून, तांत्रिक कारण असल्याने याबाबत राजकारण करू नये, असे केंद्र शासनाच्या संबंधित विभागाने म्हटले आहे.