| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ जानेवारी २०२५
सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकाराच्या जमिनीचे रूपांतर ए या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधी झालेल्या एका बैठकीत दिले.
सांगली शहरात अनेक जमीन मालकांची एल धारणाधिकार प्रकारात नोंद झाली आहे. त्यामुळे संबंधित जमीन मालकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. एल धारणाधिकार सत्ता प्रकारामुळे या जमीन मालकांना या जमिनीचे कोणतेही व्यवहार करता येत नाहीत किंवा त्यांना या जमिनीवर कर्ज प्रकरणे करता येत नाही. याशिवाय इतरही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे खाजगी व्यक्तीचे क्षेत्राचा धरणाधिकार बदलून त्याचे रूपांतर ए सत्ता प्रकारामध्ये व्हावे, अशी अनेक वर्षांचे मागणी होती. यासाठी संबंधित जमीन मालकांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता.
अखेर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पुढाकाराने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल विभागाचे उपसचिव धनंजय निकम, सत्यनारायण बजाज यांच्या उपस्थितीत सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकाराच्या जमिनीचे रूपांतर या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात एक बैठक संपन्न झाली.. या बैठकीसाठी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी महसूल मंत्री मा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की खाजगी व्यक्तीचे क्षेत्राच्या धारणा अधिकार एल बदलून त्याचे रूपांतर ए मध्ये करणे हा धोरणात्मक निर्णय आहे त्यामुळे या निर्णयास मंत्रिमंडळातील बैठकीत मान्यता घेणे आवश्यक आहे. हा पण स्वतः जातीने लक्ष घालून याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.