| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ जानेवारी २०२५
श्रीराम मंदिर चौकातून निघालेल्या हिंदू गर्जना मोर्चाच्यावेळी झालेल्या सभेत प्रभाग क्रमांक १६ च्या भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस, माजी नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी श्रीराम मंदिर चौकामध्ये १०० फुटी भगवा ध्वज उभा करणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर ॲड. स्वाती शिंदे यांनी पाठपुरावा करून महापालिकेकडून सुशोभीकरणाचे अंदाजपत्रक तयार करून अंदाजे २० लाख रुपये मंजूर करून घेतले. या कामाचा शुभारंभ प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराचे लोकार्पण झाले त्यादिवशी श्रीराम मंदिर चौकात या श्रीराम स्तंभाच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ भाजपा आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार व शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता.
या भगवा ध्वज करण्याच्या कामास सुरुवात झालेली असून लवकरच भगवा ध्वज अनावरणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करण्यात येणार आहे. आज या चालू असलेल्या कामाची पाहणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली. यावेळी संजय जाधव, अनिरुद्ध कुंभार, राजू गस्ते, अर्जुन मजले, अमित शिंदे उपस्थित होते.
श्रीराम मंदिर चौकात उभारण्यात येणाऱ्या शंभर फुटी भगव्या ध्वजामुळे या चौकास एक आगळे वेगळे महत्त्व प्राप्त होणार असून, सांगलीचे ते एक आकर्षण केंद्र ठरणार आहे. त्यामुळे हा भगवा ध्वज प्रत्यक्षात फडकण्याच्या दिवसाची हिंदू तरुण वर्ग आतुरतेने वाट पाहत आहे.