| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २३ जानेवारी २०२५
पृथ्वीराज पाटील यांनी तीन दशकं खस्ता खाल्ल्या, अनेक चढउतार अनुभवले आणि अथक परिश्रमाने गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल नावारूपाला आणले आहे.त्यांची ३३ वर्षाची तपश्चर्या फळास आली. पायी चालणं हा प्रवास, मनानं चालणं ही यात्रा आणि हृदयानं चालणं ही वारी असते. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी बहुजन शिक्षणाची वारी करुन ज्ञानदानाचे पवित्र कार्य हाती घेतले. यामधून हजारो विद्यार्थी घडले. या त्यांच्या कार्यात स्व. संयोगिता पाटील यांचे योगदान मोलाचे आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात समन्वय राखून प्रसंगी कर्तव्य कठोर होऊन विद्यार्थी घडवताना शिस्त, संस्कार बाणवत त्यांनी नावारूपाला आणलेल्या दोन केंब्रिज स्कूल्सच्या शिल्पकार म्हणून त्यांचे काम संस्थेला भूषणावह आहे. जग वेगानं बदलतयं, नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान झपाटय़ाने पुढे येत आहे. आता शाळा महाविद्यालये व विद्यापिठात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रांची निर्मिती गरजेची बाब आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील यांनी केले. जीपीएमटीच्या केंब्रिज स्कूल्सच्या शिल्पकार स्व. संयोगिता पृथ्वीराज पाटील यांचा स्मृतीदिन व त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाणाऱ्या आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील होते.
डॉ. प्रमोद पाटील पुढे म्हणाले, 'विविध क्षेत्रातील ज्ञानाच्या क्रांतीमुळे हरितक्रांती, श्वेतक्रांती झाल्या. कृषी, उद्योग, शिक्षण क्षेत्रातील संशोधनाने मानवी जीवन सुखी होत आहे. कौशल्य, उद्योग व रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारे शिक्षण ही खरी गरज आहे. आदर्श शिक्षक हा कायम विद्यार्थी असतो. डॉ. ए. पी. जे. कलाम सारख्या गरीब विद्यार्थ्यांचे शास्त्रज्ञात व मिसाईल मॅन मध्ये रुपांतर करण्याची कामगिरी शिक्षकांनी केली आहे. शिक्षक हा शिक्षणाचा मध्यबिंदू आहे. केवळ अभ्यासक्रमाच्या परिघात न राहता स्वतःशी बोलणारा, अपयशावर मात करणारा, शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करणारा विद्यार्थी घडवता आला पाहिजे.
केंब्रिज स्कूल्सच्या शिल्पकार संयोगिता पाटील यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या वतीने सन २०२३-२४ व सन २०२४ - २५ या वर्षाचे स्व. संयोगिता पृथ्वीराज पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मनिषा लेले, संध्याराणी कांबळे, मंदाकिनी जगताप व सना जमादार यांना प्रत्येकी रोख रक्कम रु. ५००० शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देऊन डॉ. प्रमोद एस. पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन २०२३-२४ व सन २०२४-२५ या वर्षातील श्रीमती जयमाला जयसिंगराव पवार पुरस्कृत स्व. संयोगिता पृथ्वीराज पाटील आदर्श सेवक पुरस्कार त्यांच्या हस्ते प्रमिला मसराज व अमोल जाधव यांना प्रत्येकी रोख रक्कम रु. ५००० शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात पृथ्वीराज पाटील म्हणाले,' गुलाबराव पाटील यांनी निःस्वार्थीपणे सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांची स्मृती जपत सार्वजनिक क्षेत्रातील कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या नावाने शिक्षण संस्था सुरु केली.मेडीकल काॅलेज, नर्सिंग, अध्यापन शास्त्र, फिजिओथेरपी, पूर्व प्राथमिक ते ज्युनिअर कॉलेज शाखांमधून हजारो विद्यार्थी घडत आहेत. संस्थेच्या सीबीएसई केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल व स्टेट बोर्ड संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल्सच्या जडणघडणीत संयोगिता पाटील यांचे लक्षवेधी योगदान असून या दोन्ही इंग्रजी माध्यम शाळांच्या त्या शिल्पकार आहेत. त्या उपजतच शिक्षिका होत्या. या शाळा नावारूपाला आणण्यात त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या आहेत.पाचवी पासून संस्कृत आणि पहिलीपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी सक्तीचा करणारा शासन निर्णय आमलात आणणारी केंब्रिज स्कूल ही पहिली शाळा आहे. याचे श्रेय संयोगिता यांना जाते.लवकरच आम्ही शाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र सुरु करीत आहोत. संयोगिता पाटील यांची स्मृती जपून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने संस्थेतर्फे आदर्श शिक्षक व संयोगिता पाटील यांच्या मातोश्री श्रीमती जयमाला जयसिंगराव पवार यांच्या तर्फे आदर्श शिक्षकेतर सेवक पुरस्कार दिले जातात. शाळांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करुन शाळेचा नावलौकिक केला आहे.आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. पुरस्काराने गुणवत्ता वाढीची जबाबदारी वाढली आहे.
प्राचार्य साहेबलाल शरीकमसलत यांनी स्वागत प्रास्ताविकात संयोगिता पाटील यांच्या योगदानाचा उल्लेख केला. प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन प्राचार्य श्रीदेवी कुळ्ळोळी यांनी केले. आभार प्राचार्या ख्रिस्तिना मार्टिन यांनी मानले.
यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती प्रमिलादेवी गुलाबराव पाटील, विश्वस्त सर्वश्री अॅड. विरेंद्र पाटील, शंकर तावदारे, डॉ. इक्बाल तांबोळी, समन्वयक प्राचार्य सतीश पाटील,डॉ. प्रा. प्रकाश कदम, सर्व प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.