| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जानेवारी २०२५
आ. गोपीचंद पडळकर हे नेहमीच माजी मंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर नेहमीच जहरी टीका करीत असतात. यापूर्वी आ. पडळकर यांनी आ. जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपामुळे त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. रविवारी पुन्हा एकदा आ. पडळकर यांनी आ. जयंत पाटील यांना शिंगावर घेतल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
सांगली येथील स्टेशन चौकात आ. सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरदादा गाडगीळ, आ. बाबासाहेब देशमुख आणि आ. गोपीचंद पडळकर यांचा धनगर समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. पडळकर यांचे जीभ पुन्हा एकदा घसरली. कृष्णा नदीच्या काठावरील दिग्गज मंडळींनी जत सारख्या दुष्काळी भागावर नेहमीच अन्याय केला असल्याची टीका करीत असतानाच, "स्व. आर आर आबांचा पोरगं आमदार होतंय, मात्र आपलं पोरगं होत नाही, हीच आ. जयंत पाटील यांची खंत आहे." असा आरोप केला.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे वाळवा तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी पडळकर यांना सुनावले. आ. जयंत पाटील हे मंत्रीपदावर असताना, जत तालुक्यासाठी केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली व आपले कर्तुत्व काय ? असा सवाल आ. पडळकर यांना केला.
यानंतर आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाची महिला आघाडी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आ. पडळकर यांनी आमचे नेते आ. जयंत पाटील यांच्यावरील वैयक्तिक टीका थांबवावे अन्यथा यापुढे महिला आघाडी तर्फे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनी दिला आहे.
आ. पडळकर हे केवळ आ. जयंत पाटील यांच्यावर टीका करीत असल्याचे दिसते, त्यांचे विकासात्मक काम कुठेच दिसून येत नाही. पहिल्यांदा आ. जयंत पाटील यांच्यावर टीका करण्याइतके तुम्ही मोठे व्हा, मग आपली जीभ उचला. असे जाधव यांनी म्हटले आहे.
यावेळी महिला आघाडीच्या साधना पाटील, स्मिता पाटील, मनीषा पाटील, सुमित्रा देशमाने, मीनाक्षी आक्की, सुरेखा कोळेकर, नलिनी पवार, नंदाताई पाटील, शुभांगी साळुंखे, भारती पाटील, मीनाक्षी माने, कमल पाटील, सत्वशीला पाटील इ. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.