yuva MAharashtra सांगलीमध्ये हिंदू व्यवसायिकांच्या प्रदर्शनाचे ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार सुरुवात !

सांगलीमध्ये हिंदू व्यवसायिकांच्या प्रदर्शनाचे ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार सुरुवात !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ जानेवारी २०२५
सांगली महापालिका क्षेत्रामध्ये असलेले बारा बलुतेदार आणि सेवा देणारे छोटे हिंदू व्यवसायिक यांच्या व्यवसायांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्राचे मस्त व बंदरे मंत्री ना. नितीश राणे यांच्या हस्ते होणार आहे. छोट्या हिंदू व्यावसायिकांचे व्यावसायिक क्षितिज विस्तारण्यासाठी भाजपा नेत्या नीता केळकर व त्यांचे पती श्रीरंग केळकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन होत आहे, अशी माहिती हिंदू एकता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी एका पत्रकार बैठकीत दिली.


केळकर दाम्पत्यांच्या प्रयत्नातून एक संस्था कार्यरत असून, या मार्फत दोन मोफत व्यावसायिक कार्यशाळा ही आयोजित करण्यात आल्या होत्या. अत्यंत छोट्या प्रमाणात व प्रामाणिकपणे कष्ट करून सेवा देणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वकर्मा योजनेला सकारात्मक दृष्ट्या प्रत्यक्षात आणण्यासाठी ही संस्था कार्यरत असून, कार्यशाळेनंतर भव्य प्रदर्शन हा याचा पुढचा टप्पा आहे.

या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेकडे नोंदणी झालेल्या पाच हजार विविध व्यवसायांची माहिती देणारी डिरेक्टरी या निमित्ताने प्रकाशित करण्यात येणार आहे. ज्यामुळे यातील सहभागी व्यवसायिकांचा महापालिका क्षेत्रातील नागरिकांनाही चांगला फायदा होऊ शकतो.

सांगली शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या चेतना हॉल या ठिकाणी या प्रदर्शनाचे उद्घाटन 10 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता ना. नितीश राणे यांच्या हस्ते होत आहे. हिंदू एकता आंदोलन आणि हिंदू व्यवसाय बंधू यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर मराठा समाज सांस्कृतिक हॉलमध्ये हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक हिंदू बंधू-भगिनींनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक नंदकुमार बापट सर आणि श्रीरंग केळकर यांनी केले आहे.