| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. ७ जानेवारी २०२५
सांगली जिल्ह्यातील बेकायदेशीर सावकारीचे लोण आता विटा शहरातही फोफावले आहे. त्याचा मोह थेट खाकी वर्दीलाही सुटला आहे. बेकायदा सावकारीद्वारे पाच लाख रुपये व्याजाने देऊन कोट्यवधीची जमीन हडपण्याचा प्रकार पोलिसाने केला आहे. पिडीत कर्जदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यावर चौकशीचा फक्त फार्स सुरू आहे.
विटा शहराला सुवर्णनगरी म्हटले जाते. इथल्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्या हडपण्याचा मोहात काही पोलिसही अडकले आहेत. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' म्हणून सामान्य माणसाला न्याय देऊन दुर्जनांना अद्दल घडविण्याऐवजी पोलिस दुर्जनांनाच हाताशी धरत असल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. मायाक्कानगरमधील रहिवासी आनंदा कदम यांना फायनान्स कंपनीचे कर्ज भरायचे होते. त्यामुळे त्यांनी एका खासगी बेकायदा सावकाराकडून पाच लाख रुपयांचे कर्ज ५ टक्के व्याजाने घेतले. त्यासाठी त्याच्याकडून रजिस्टर साठेखत व कुलमुखत्यारपत्र लिहून घेण्यात आले.
व्याजाचे २५ हजार रुपयेही आगाऊ घेण्यात आले. पुढे काही हप्ते थकल्यानंतर सावकाराने तुझे साठेखत एका पोलिसाच्या नावावर असल्याचे सांगितले. मी दिलेल्या कर्जाचे पैसे व व्याजही त्याचेच आहे, असे म्हणत धमकावले. कर्जापोटी लिहून दिलेली जागा संबंधित सावकार पोलिसाने स्वतःच्या नावावर केल्याचेही स्पष्ट झाले. त्याचे नावही सातबाऱ्यावर चढले आहे.
अशी केली जागा हडप
पाच लाखांच्या कर्जाचे व्याज थकल्याने आनंदा कदम यांच्यामागे सावकाराने वसुलीचा तगादा लावला. धमकावून पॅन कार्ड व आधार कार्ड घेतले. जबरदस्तीने त्यांच्या सह्या घेऊन १२.५ गुंठे जागा बक्षीसपत्राद्वारे संबंधित पोलिसाच्या नावावर लिहून घेतली. हा प्रकार विटा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या हद्दीत घडला आहे. हा पोलिस कडेगाव तालुक्यातील पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्याची बहीण मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस निरीक्षक आहे. 'त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही' असे सांगत संबंधित सावकाराकडून कदम यांना तक्रार न करण्यासाठी वारंवार धमकावले जात आहे.
'तुमचे सगळे पैसे परत देतो, पण मला माझी वडिलोपार्जित जागा परत द्या' म्हणून कदम कुटुंबीयांनी न्याय मिळण्यासाठी विटा पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे २३ डिसेंबरला तक्रार अर्ज दाखल केला आहे. पण त्यानंतर अजूनही न्याय मिळालेला नाही. कुंपणच शेत खाऊ लागले तर दाद कोणाकडे मागायची? अशी अवस्था विटा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सामान्य माणसांची झाली आहे.
'त्या'च्या कारनाम्यांची चौकशी होणार का ?
विटा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संबंधित पोलिसाचा बेकायदेशीर सावकार व एजंटांना हाताशी धरून व्याजाने पैसे लावण्याचा धंदा सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत त्याने त्याच्या नातेवाईकांनी विटा व चितळी येथील काही जमिनी खरेदीचा सपाटा लावला आहे. या कारनाम्यांचीही चौकशी होणार का? असा सवाल तक्रारदाराने उपस्थित केला आहे.
तक्रारदाराचा अर्ज प्राप्त झाला आहे. पोलिसाच्या बेकायदा सावकारीच्या तक्रारीची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये तो दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- विपुल पाटील,
पोलिस उपअधीक्षक, विटा.