| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जानेवारी २०२५
मागील आठवड्यात राजगुरुनगर येथील बार मध्ये काम करणाऱ्या वेटरने गोसावी समाजातील अवघ्या नऊ वर्षाच्या दुर्वा व कार्तिकी यांची निर्घृण हत्या केली. याचे पडसाद राजगुरुनगर सह संपूर्ण राज्यभरातील गोसावी समाजात उमटले. परिणामी समाजात प्रचंड उद्रेक व्यक्त होत असून, दूर्वा व कार्तिकीच्या मरणप्राय किंकाळ्या, वाल्मिकी कराड प्रकरणात विरून जाऊ नयेत वशासनाने दोषी वेटरला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यासाठी आकाश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी मोर्चाला संबोधित करताना आकाश गोसावी म्हणाले की, राजगुरुनगर येथील मकवाने कुटुंब हे अत्यंत गरीब असून, या दोन्ही सख्ख्या बहिणीवर गुदरलेल्या दुर्दैवी प्रसंगाने हे कुटुंब हादरले आहे. अशा वेळी समाजाने आणि शासनाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. गुन्ह्यातील परप्रांतीय हाच दोषी आहे, की समाजात तेढ माजू नये म्हणून त्याला समोर आणले गेले आहे ? हा आमच्या मनात अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे याबाबत सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करून आकाश गोसावी म्हणाले की, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येऊन, मा. उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी.
सध्या मकवाने कुटुंब हे मानसिक दृष्ट्या उध्वस्त झाले असून, त्यांना शासनाने अधिकाधिक आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ही आकाश गोसावी यांनी केली आहे. दरम्यान सोमवारी सांगली येथील विजयनगर परिसरात जिल्ह्यातील शेकडो गोसावी समाज मकवाने कुटुंबातील कार्तिकी व दुर्वा या बहिणींना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी एकत्र आला होता. त्यांच्या आक्रोशाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता.
दरम्यान बीड येथील वाल्मिकी कराड प्रकरणामुळे राजगुरुनगर येथील मकवाने चिमुकल्यांच्या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष होऊ नये अशी मागणी ही गोसावी समाजातून होत आहे.