फोटो सौजन्य : flicker.com
| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ जानेवारी २०२५
सांगली बसस्थानकावरून गेल्या वर्षभरात तब्बल १० कोटी ३२ लाख ४७ हजार जणांनी प्रवास केला आहे. एस. टी. ला यंदा ४९ कोटी ४ लाख १६ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. हा विक्रमी आकडा आहे. सुरक्षित प्रवास, लांब गावी जाण्यासाठी एसटीतून वेळेत आणि आरामदायी प्रवास होत असल्याने प्रवाशांनी एस. टी. प्रशासनाच्या कामावर विश्वास व्यक्त केल्याचे या आकडेवारीवरून समोर येत आहे.
सांगली आगारातून आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, विटा, कोल्हापूर, पुणे, बेळगाव, मिरज, इस्लामपूर या गावी रोज बस सोडल्या जातात. एस. टी. ने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गर्दी असली तरी उभारून जाऊ, पण एसटीनेच जाऊ, अशी वृद्ध प्रवाशांची प्रतिक्रिया असते.
महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरातील सूट, तेरा वर्षांच्या आतील मुलांना निम्मे तिकीट दर आकारले जात आहे. महिला सन्मान योजनेमुळे महिला एसटी प्रवासाला प्राधान्य देत आहेत.
नोकरदार वर्ग, शाळेला जाणारी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांना कामाच्या ठिकाणी वेळेत आणि सुरक्षित प्रवास करता येत आहे. राज्य शासनाच्या महिला सन्मान योजनेमुळे महिलांनी खासगी रिक्षा, वाहनाकडे पाठ फिरल्याचे चित्र आहे. १७ मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजना सुरू झाली आहे. योजनेपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या कमी होती, ती आता वाढली आहे. जानेवारी २०२४ ते डिसेंबर अखेरपर्यंत ३ कोटी २५ लाख ६३ हजार २४२ महिलांनी प्रवास केला आहे. तसेच या योजनेंतर्गत एसटीला ८० कोटी ७५ लाख ४८ हजार ७४४ इतके उत्पन्न मिळाले आहे. या योजनेचा सर्वधिक लाभ ग्रामीण भागातील महिलांनी घेतला आहे.
ऑनलाईन पेमेंटची सुविधा
एसटी बसचे तिकीट आता ऑनलाईन, 'यूपीआय'च्या साहाय्याने पैसे अदा करून काढता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुट्या पैशांचा त्रास कमी होत आहे. सध्या ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आगाराकडे १६०० ॲन्ड्राईड ईटीआय मशीन आहेत. तिकिट काढण्यापूर्वी या मशीन मधील क्यूआर कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे अदा केले जातात. विशेषतः ग्रामीण भागातील महिला, वृद्ध नागरिकांना याविषयी अधिक माहिती नसल्याने ते ऑनलाईन तिकिट काढण्यास टाळाटाळ करतात. जानेवारी २०२३ ते डिसेंबर अखेरपर्यंत ९ कोटी १२ लाख ४५ हजार ३०५ इतके रक्कम ऑनलाईन पेंमेटमधून मिळाली आहे.
महिला सन्मान योजनेमुळे ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. आगारात ऑनलाईन पेमेंटची सुविधा केल्याने सुटे पैसे नसल्यास 'गुगल पेमेंट'चा उपयोग होत आहे. वेळेत आणि सुरक्षित प्रवास करता येत असल्याने प्रवाशांनी एसटीला पसंती दिली आहे.- सुनील भोकरे,एसटी विभागप्रमुख, सांगली