| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ जानेवारी २०२५
दैनिक सकाळ सांगली आवृत्ती आपला 41 वा वर्धापन दिन 5 जानेवारी 2025 रोजी साजरा करीत आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ दैनिक सकाळशी सांगलीकरांचे ऋणानुबंध जोडलेले आहेत. सांगलीच्या विकासाचा साक्षीदार होण्याबरोबरच दैनिक सकाळने सांगलीकरांच्या समस्याही तितक्याच पोटतिडकीने मांडलेल्या आहेत. परिणामी दैनिक सकाळ व सांगलीकर यांचे अतूट नाते दिसून येते.
दरवर्षी दैनिक सकाळ वर्धापन दिनाच्या निमित्ताने विचार मंथन घडविणारे व्याख्यान किंवा रसिकांना मनोरंजनाची पर्वणी ठरणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असतो. यावर्षी महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, संस्कृती, सण उत्सवांचे दर्शन घडविणाऱ्या 'महाराष्ट्राची सण यात्रा' हा नृत्य गीत संगीताचा कार्यक्रम दैनिक सकाळने आयोजित केला आहे.
स्वरांश इंटरटेनमेंट व प्रभा इंटरप्राईजेस संयोजित या कार्यक्रमाचे राज्यभर अनेक कार्यक्रम झाले असून, रसिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्राच्या घराघरात चैतन्य निर्माण करणाऱ्या सणांची, उत्सवांचे महती सांगणारा, त्यामागची भूमिका विशद करणारा हा एक वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम सांगलीकरांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. उद्या रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सांगलीतील भावे नाट्य मंदिर येथे हा नेत्रदीपक कार्यक्रम संपन्न होणार आहे.