| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जानेवारी २०२५
युनोने २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन सहकार विभाग, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन्स, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, मल्टीस्टेट सोसायटी फेडरेशनतर्फे, पतसंस्थेची शिखर संस्था असलेल्या पतसंस्था फेडरेशनचे मुंबईचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या पुढाकारातून ८ व ९ फेब्रुवारीला शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली आहे. अशी माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव श्री. शशिकांत राजोबा यांनी दिली. गुरूवारी (ता. ३०) रोजी वीराचार्य पतसंस्थेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना श्री राजोबा पुढे म्हणाले की, राज्याच्या अर्थकारणामध्ये पतसंस्था चळवळीचे महत्त्वपूर्ण भूमिका असल्याने या पतसंस्थांचे कार्य व योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्यात, यादृष्टीने राज्य पतसंस्था फेडरेशनने दोन सहकार दिंड्यांचे आयोजन केले आहे. यातील मुंबई येथून निघणारी स्व. धनंजय राव गाडगीळ सहकार दिंडीचे रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सांगली नगरीमध्ये शुभागमन होणार आहे. या दिंडीचे स्वागत सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते होणार असून, यावेळी जिल्हा उपनिबंधक श्री मंगेश सुरवसे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. पृथ्वीराज पाटील, श्री. राहुल महाडिक, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. काकासाहेब कोयटे, कर्मवीर पतसंस्था सांगलीचे चेअरमन श्री रावसाहेब पाटील, सहकार भारती चे संपर्कप्रमुख श्री. संजय परमणे, सांगलीचे चार्ट अकाउंटंट श्री. श्रीगोपाळ सारडा, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन श्री अजित कुमार भंडे हे उपस्थित राहणार आहेत.
सांगली ही सहकार पंढरी समजली जाते. या सहकार पंढरीत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांमध्ये, ज्यांनी सहकाराचा पाया रुजवला त्याच स्व. धनंजयराव गाडगीळ यांच्या नावे असलेल्या सहकार दिंडीचे आगमन या सहकार पंढरीत होत आहे. ही आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. असे सांगून श्री राजोबा पुढे म्हणाले की, या दिंडीचे स्वागत व सांगली शहरातील महत्त्वाच्या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या दिंडीमध्ये सहकार पंढरीतील सर्व वारकरी अर्थात सांगली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सर्व संचालक व सांगली येथील अनेक पतसंस्थांचे पदाधिकारी, सहकारातील कार्यकर्ते उपस्थितीत राहणार आहेत. या दिंडीमध्ये सुरुवातीस पालखी असून या पालखीमध्ये स्व. धनंजयराव गाडगीळ, स्व. वसंतदादा पाटील, यांच्यासह ज्यांनी सहकार्यासाठी आयुष्य वेचले, अशा मान्यवरांच्या तस्वीरी असणार आहेत. जाणाऱ्या त्या पाठोपाठ सहकाराचे महत्व सांगणारे चित्ररथ तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी, सुशोभिकरण होणार आहे. ही सहकार दिंडी सांगली नगरीमध्ये कर्मवीर पतसंस्था सांगली मुख्यालय सांगली येथून सुरूवात होवून दुपारी एक वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करून दिंडी पुढे सातारासाठी रवाना होणार आहे. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण दिंडीमध्ये सांगली जिल्ह्यातील पतसंस्था फेडरेशन परिवारातील सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, सहकार पंढरीचा अभिमान, स्वाभिमान दृश्यमान व्हावा, अशी अपेक्षा श्री. शशिकांत राजोबा यांनी यावेळी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेवेळी, सहकार भारतीचे संजय परमणे, सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन श्री. ए. डी. पाटील, व्हा. चेअरमन डॉ. सिध्दनाथ महाडिक, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन अजितकुमार भंडे, व्हा. चेअरमन अरूण पाटील, सहकार भारतीचे शैलेश पवार आदी उपस्थित होते.