yuva MAharashtra राज्यातील शाळांची 26 जानेवारी सुट्टी रद्द, मुले घेणार या विषयाचे धडे !

राज्यातील शाळांची 26 जानेवारी सुट्टी रद्द, मुले घेणार या विषयाचे धडे !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ जानेवारी २०२५
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हे देशाचे दोन मोठे सण. या दिवशी देशभरातील शाळांना ध्वजवंदन झाले की सुट्टी ठरलेली. त्यामुळे बालगोपाल हे आनंदित असायचे. पण यापुढे ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने नुकताच एका परिपत्रकाद्वारे जाहीर केला आहे. यानुसार राज्यातील सर्व सरकारी व खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेतच दिवसभर देशभक्तीवर आधारित विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशाचा गौरवशाली इतिहास आपली महान संस्कृती आणि ज्यांच्या हाती देशाचे भवितव्य आहे, त्यांचे भविष्य घडवण्याचे प्रयत्न या माध्यमातून होणार आहेत यामुळे राष्ट्रीय अभिमानाची भावना ही निर्माण होईल हा या मागचा उदात्त हेतू आहे. 

या परिपत्रकामध्ये या दिवशी घेण्यात येणाऱ्या आठ प्रकारच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांची यादीच या परिपत्रकातून देण्यात आली आहे. त्यानुसार ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी, वक्तृत्व व कविता स्पर्धा, नृत्य, चित्रकला, निबंध आणि क्रीडा स्पर्धा तसेच प्रदर्शन यांचा समावेश केला आहे. हे सगळे कार्यक्रम देशभक्तीवर आधारित असावेत असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापनाला राज्य शासनाचा या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. यातून राष्ट्र निर्माणाचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर कोरला जाणार असला तरी, एक हक्काची सुट्टी रद्द होणार आहे. त्यामुळे सुट्टीचा आनंद घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे.