| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. २१ जानेवारी २०२५
विटा येथील शासकीय निवासी शाळेमधील 23 विद्यार्थ्यांना, रविवारी रात्रीच्या सुमारास मुलांना देण्यात आलेल्या मांसाहारी जेवणातून विषबाधा झाल्याने सर्वत्र खळबळ माजली. सकाळपासून मुलांना मळमळ, जुलाब, पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तातडीने त्यांना विट्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, आमदार सुहास बाबर यांनी आमदार सुहास भैय्या बाबर यांनी शासकीय निवासी शाळेत डॉक्टरांची टीम पाठवून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना विट्यात बोलवून विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तातडीने त्याचा अहवाल देण्याच्या सूचना संबंधीत डॉक्टरांना दिल्या.
सांगलीचे कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा अलर्ट केली आहे. जवळपासच्या शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि बालरोग तज्ञांना ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन आवश्यकतेनुसार उपचार करण्याचे निर्देश दिले. तर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संबंधित घटनेबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल आणि गटविकास अधिकारी पाटील यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
याबाबत माहिती देताना विटा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी विशाल नलावडे म्हणाले की, सोमवारी सकाळी काही मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्रास होऊ लागलेल्या मुलांची संख्या वाढू लागली. सध्या 23 विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून सर्वांचीच प्रकृती स्थिर आहे.
मुख्याध्यापक, गृहपाल व भोजन ठेकेदार
यांच्यावर कारवाई !
दरम्यान शासकीय निवासी शाळा विटा येथील घटनेबाबत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. नितीन उबाळे यांनी सांगितले की, या घटनेस जबाबदार असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक, गृहपाल व भोजन ठेकेदार यांना कारणे दाखवा नोटीस दिली असून अन्न व औषध प्रशासन विभागाचा अहवाल प्राप्त होताच संबंधित भागात कारवाई करण्यात येईल.
याबाबत उपचार घेणाऱ्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितले की, रविवारी दुपारी विद्यार्थ्यांना खाण्यासाठी मांसाहारी जेवण देण्यात आले होते. त्यानंतर दुपारी चार वाजता नाष्ट्यासाठी कलिंगड आणि दूध दिले होते. रात्री सात वाजता नेहमीप्रमाणे चपाती आमटीचे जेवण दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाल्या. सोमवारी सकाळपासून आम्हाला पोटदुखी, जुलाब व उलट्या असा त्रास सुरू झाला. ही बाब शिक्षकांना निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्हाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ज्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली ती निवासी विद्यार्थी शाळा समाज कल्याण विभागाच्या वतीने चालविण्यात येते. यामध्ये जवळपास 93 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रविवारी सुट्टी असल्याने काही विद्यार्थी हे आपल्या घरी गेले होते, तर या ठिकाणी 49 विद्यार्थी उपस्थित होते. यामधील 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी विशाल नलावडे यांनी दिली.
विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची नावे -
सुरज प्रकाश जाधव ( वय १६ ), श्रवणकुमार विठ्ठल बागडे ( वय १७ ), सुरज किसन साठे ( वय १५ ), आदित्य आनंदा रोकडे ( वय १६ ), निर्मल किशोर सावंत (वय १४ ), स्मित सुभाष झिमरे ( वय १२ ), योगेश बिरुदेव मोटे ( वय १३ ), शुभम प्रकाश माळवे ( वय १४ ), हर्षवर्धन सुनील गायकवाड ( वय १३ ), तेजस सचिन काटे ( वय १५ ), आदित्य कैलास लोखंडे ( वय १६ ), आरूष संजय सकट ( वय १२ ), यश विजय सकट ( वय १२ ), श्रीवर्धन प्रवीण माने ( वय ११ ), प्रज्वल शशिकांत शिंदे ( वय १६ ), सिद्धार्थ जित्ताप्पा बनसोडे ( वय १३ ), आयुष नामदेव सावंत ( वय १३ ), तन्मय प्रकाश निकाळजे ( वय १४ ), सक्षम दिनकर सुखदेव ( वय १४ ), संदीप सुदर्शन नातपुते ( वय १४ ), प्रणव सुर्यकांत उबाळे ( वय १६ ), अभिषेक गौतम डोळसे ( वय १२ ), चैतन्य शशिकांत शिंदे ( वय १२ ), सक्षम तानाजी चंदनशिवे ( वय १२ ) अशी त्यांची नांवे आहेत.