सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ जानेवारी २०२५
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. महाआघाडीला धोबीपछाड देत तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे, यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे सेना युतीचे महाराष्ट्र सरकार अस्तित्वात आले. नंतर (शरद) काकांना टांग मारून अजित पवारही या युतीत सहभागी झाल्यानंतर महायुतीच्या नामोल्लेखाने हे सरकार ओळखले जाऊ लागले. या सरकारच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. ज्यामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचा समावेश केला गेला. अर्थातच या महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. मात्र तरीही हा प्रोजेक्ट राबविण्यासाठी आधी सूचना काढली गेली. ज्या अनेक कारणामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला, त्यापैकी नागपूर गोवा शक्ती हेही एक कारण असल्याचे सांगितले जाते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने हा प्रोजेक्ट गुंडाळून ठेवण्याचे ठरवले. तत्पूर्वी काढलेली अधिसूचना नव्या अधिसूचनेने रद्दही केले गेले. परंतु त्यावेळी महाआघाडीच्या नेत्यांसह शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात आलेली अधिसूचना म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे सांगितले होते. आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचे सूत्रे हाती घेताच पुन्हा एकदा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी नव्याने आदेश दिले असून, त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता ही जबाबदारी मिरज आणि विटा प्रांताधिकार्यांना देण्यात आली आहे व त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातून तरी ज्याप्रमाणे या महामार्गाचे नियोजन होते त्याप्रमाणेच हा महामार्ग जाणार हे मात्र निश्चित झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध झाला होता व त्यामुळे या जिल्ह्यात आता वगळण्यात आले आहे. परंतु सांगली जिल्ह्यातून देखील विरोध असताना मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचे या माध्यमातून दिसून येत आहे.
या महामार्गात सांगली जिल्ह्यातील 18 गावांचा समावेश करण्यात आला असून रस्ते विकास महामंडळाने नुकतीच बैठक घेऊन त्या संदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील जमिनीच्या 1,340 गटांमधून हा मार्ग जाणार असून यामध्ये तब्बल 596 हेक्टर क्षेत्र अधिगृहित केले जाणार आहे. रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाला असताना पुन्हा हा शक्तीपीठ समांतर महामार्ग कशासाठी असा शेतकऱ्यांचा सवाल आहे ?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासह अनेक नेत्यांसह शेकरू शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला आहे. मात्र सरकारकडून या महामार्गाची भलावन करण्यात येत असून, केवळ सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी या महामार्गावरून पुन्हा एकदा रणकंदन सुरू होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.