| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जानेवारी २०२५
मिरज म्हणजे वैद्यकीय पंढरी समजली जाते, इथली तंतुवाद्य तर जगप्रसिद्ध. इथल्या अनेक सुपुत्रांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने मिरजेचे नाव जगाच्या नकाशावर कोरले... रेल्वे जंक्शनमुळे हे शहर देशाच्या कानाकोपऱ्याची जोडले गेले. पण त्याचवेळी मिरजेचे नाव बदनाम करणारे काही मंडळी याच ऐतिहासिक शहरात आढळून येतात. विशेषतः काही मुठभर मंडळींमुळे ड्रगच्या कनेक्शनमुळे मिरजेचे नाव खराब होत आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींना वचक बसवण्यासाठी पोलीस आपल्या परीने मेहनत घेत आहेत. काल महात्मा गांधी चौक पोलिसांनी 14 लाखांचे मेफेंटरमाईन इंजेक्शनसह तिघांच्या मुस्क्या आवळून कौतुकास्पद कामगिरी केली.
जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली ती अशी की, मिरजेत नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेन्टरमाइन इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून रोहित अशोक कागवाडे, (वय 44, रा. आकांक्षा मेडिकल वरील बाजूस, शामराव नगर, सांगली), ओंकार, रवींद्र मुळे (वय 24, रा. विजय कॉलनी, गव्हर्नमेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली), आणि अशपाक बशीर पटवेगार ( वय 50, रा.. आजोबा हॉटेल समोर, पत्रकार नगर, सांगली) या तिघांच्या मुस्क्या आवळल्या.
या कारवाईमध्ये मिरजेतील एका औषध दुकानात मोठ्या प्रमाणात मेफेंटरमाईनचा मोठ्या प्रमाणात साठा असून तेथून नशेखोरांना हे इंजेक्शन प्ले ची माहिती उघड झाली. त्यानंतर संबंधित औषध दुकानावर छापा टाकून तब्बल 14 लाखांचे पंधराशे इंजेक्शन्स दहा मिलीच्या 1507 बॉटल आणि 176 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील अशा प्रकारची नशेची इंजेक्शन्स आणि गोळ्या जप्त करण्याचे ही सर्वात मोठी कामगिरी आहे. पोलीस ही इंजेक्शन व गोळ्या कोठून आणल्या आणि त्या विक्रीसाठी कोठे नेल्या जात होत्या याचाही आता तपास करीत आहेत. आरोपी मधील एकाचे स्वतःचे मेडिकल आहे. अटक केलेले हे छोटे मासे आहेत. यामागे मोठे यंत्रणा असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान अशा पद्धतीची नशेची इंजेक्शन, गांजा आणि इतर नशेचे पदार्थ मिरजेत मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नागरिकातून व्यक्त होत असून, आजच्या धाडसी व कौतुकास्पद छाप्याप्रमाणे इतर ठिकाणे व मिरजेला बदनाम करणाऱ्या आरोपींना शोधून अटक करावी, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.