| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ जानेवारी २०२५
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून आज तिन्ही शहरात विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या नियोजनानुसार आजच्या
स्वच्छता मोहिमेत आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्या नेतृत्वाखाली 1200 कर्मचारी सहभागी झाले होते.
सांगलीतील छत्रपती शाहू महाराज मार्ग, कुपवाड चाणक्य चौक ते होळकर चौक आदी परिसरात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या विशेष स्वच्छता मोहिमेत अंदाजे 15 टन कचरा संकलित करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिन्ही शहरातील प्रमुख मार्गाची स्वच्छता केली.
सांगलीसह कुपवाड आणि मिरज शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होत असल्याच्या तक्रारी आयुक्त शुभम गुप्ता यांना प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेऊन शुभम गुप्ता यांनी तिन्ही शहरात स्वच्छता मोहिमेत राबविली. यापुढेही नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन केवळ कचरा उठावच नव्हे, तर महापालिकेच्या संदर्भातील सर्वच तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाणार आहे.