| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २६ डिसेंबर २०२४
नुकत्याच पार पडलेल्या ५५व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये GST अर्थात वस्तू व सेवा करासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातला एक निर्णय सध्या चर्चेत आला असून त्यानुसार जुन्या गाड्यांच्या विक्रीवर आता १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश आहे. 'सेकंड हँड' गाड्यांच्या मार्केटमध्ये या निर्णयामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात खोचक पोस्ट करताना सामाजिक कार्यकर्ते व वरीष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना लक्ष्य केलं आहे.
जीएसटी कौन्सिलच्या निर्णयानुसार, एखाद्या वापरलेल्या किंवा सेकंड हँड कारची विक्री करताना त्या कारची मूळ किंमत व पुन्हा विक्री होत असलेली किंमत यातील तफावतीच्या रकमेवर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. उदाहरणार्थ १२ लाखांची कार ९ लाखांना विकली जात असले, तर त्यात ३ लाखांवर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल. शिवाय, ही तफावत जर वजामध्ये असेल, अर्थात विक्री होणारी किंमत मूळ किमतीपेक्षा जास्त असेल तर त्यावर जीएसटी आकारला जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, जीएसटी कौन्सिलनं घेतलेल्या या निर्णयाबाबत प्रशांत भूषण यांनी केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये प्रशांत भूषण यांनी उदाहरण देऊन यातून कशा अडचणी निर्माण होऊ शकतात, याबाबत दावा केला आहे. तसेच, त्यासंदर्भात भाष्य करतानाच निर्मला सीतारमण यांना टोलाही लगावला आहे.
"निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की तुमची जुनी कार विकताना तिची मूळ खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातल्या तफावतीएवढ्या रकमेवरच तुम्हाला १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही १० वर्षांपूर्वी १० लाख रुपयांना एक कार खरेदी केली असेल आणि आता तुम्ही ती १ लाख रुपयांना विकत असाल, तर तुम्हाला तफावतीच्या फक्त ९ लाख रुपये रकमेवर १८ टक्के जीएसटी भरावा लागेल. त्यामुळे तुम्हाला १ लाख रुपयांच्या कार विक्रीसाठी प्रत्यक्षात १ लाख ६२ हजार रुपये जीएसटी भरावा लागेल. हा जीएसटी भरण्यासाठी तुम्हाला तुमचे कपडेही विकावे लागतील! निर्मला सीतारमण या जीनियस आहेत. भर थंडीत लोकांना अंगावरचे कपडे विकायला लावण्याचा मार्ग त्यांनी शोधून काढला आहे", असं प्रशांत भूषण यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.