| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ डिसेंबर २०२४
कामात हयगय करणार्या अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. कामातील शिथिलता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी येथील वाळवा पंचायत समितीतील आढावा बैठकीत दिला.सर्व विकास योजना व कामे विहित मुदतीत पूर्ण करून मार्च 2025 अखेर सर्व निधी खर्च करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शशिकांत शिंदे, किरण सायमोते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ, कार्यकारी अभियंता भारती बिरंगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीशकुमार जाधव, कार्यकारी अभियंता संजय येवले, गटविकास अधिकारी आर. बी. पांढरे यांच्यासह पंचायत समितीतील खाते प्रमुख उपस्थित होते.
पंचायत विभाग अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतस्तर सन 2020-2021 व 2023-2024 च्या खर्चाचा गावनिहाय आढावा घेण्यात आला. ज्यांचे काम अत्यंत असमाधानकारक आहे त्या ग्रामपंचायत अधिकार्यांना नोटीस देण्याबाबत चर्चा झाली. घरपट्टी वसुली जानेवारी 2025 पर्यंत 60 टक्के करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामपंचायत स्तरावर कर वसुली व विविध विकास कामे, शासकीय योजना यांची अंमलबजावणी करताना जे सरपंच अथवा ग्रापमपंचायत पदाधिकारी या कामांना चालना देत नाहीत अथवा प्रयत्न करत नाहीत अशा सदस्यांविरुध्द 39 (1) चा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील 'घरकुल'च्या अपूर्ण कामांबाबत चर्चा झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघ यांनी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व महिला व बाल कल्याण या विभागांचा आढावा घेतला.
ई-ऑफिस प्रणाली अंमलबजावणीबाबत नाराजी
वाळवा पंचायत समिती ई-ऑफिस प्रणाली अंमलबजावणीबाबत तृप्ती धोडमिसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्यांची कामे कमी आहेत, त्यांना नोटीस देऊन खुलासा करावा. सर्व कामकाज ई-ऑफिसमार्फत यावे. सेवानिवृत्ती प्रकरणे, अभिलेख वर्गीकरण, सेवा पुस्तके अद्ययावत करण्यासाठी कॅम्प आयोजित करून ते काम 15 दिवसांच्या पूर्ण करण्याच्या सूचना धोडमिसे यांनी केल्या.