yuva MAharashtra गादीला मान देण्याचीही दानत काँग्रेसमध्ये नाही का ? कोल्हापूरवासियांकडून नाराजी व्यक्त !

गादीला मान देण्याचीही दानत काँग्रेसमध्ये नाही का ? कोल्हापूरवासियांकडून नाराजी व्यक्त !


| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. ३ डिसेंबर २०२
वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी विजयी झाल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी व खासदार प्रियांका गांधी यांचे एक छायाचित्र समाजमाध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहे. या छायाचित्रात कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांना मागच्या रांगेत उभे करण्यात आल्याचे दिसत आहे. यावरून 'छत्रपतींच्या गादीचा पुन्हा अपमान' अशा आशयाच्या पोस्ट करत नेटकर्‍यांकडून काँग्रेसवर चौफेर टीका केली जात आहे. 


प्रियांका गांधी यांनी हातात संविधान घेऊन शपथ घेतली. शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन काँग्रेसकडून राजकारण केले जाते. मात्र, शाहू महाराज यांचा वारसा ज्यांच्याकडे आहे, त्या कोल्हापूरची शान असलेल्या शाहू महाराज यांचा पुन्हा-पुन्हा अपमान होत आहे, अशी भावना अनेक जण व्यक्त करत आहेत. राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या बाजूला एक खुर्ची रिकामी असतानाही शाहू महाराज यांना मागच्या रांगेत उभे करण्यात आल्याचे या फोटोमध्ये दिसते. छत्रपतींच्या घराण्यापेक्षा गांधी घराणेे मोठे आहे का? किमान छत्रपतींच्या गादीला तरी मान देण्याची दानत यांच्यात नाही का ? अशा आशयाच्या मजकुराखाली हे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत. 

यापूर्वीदेखील विधानसभा निवडणुकीत मधुरिमाराजे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली होती. अर्ज माघारीदिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या व मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतला. यावेळी सतेज पाटील यांच्याकडून गादीचा अपमान झाल्याची टीका करण्यात आली होती. आता पुन्हा काँग्रेसकडून शाहू महाराज यांचा अपमान झाला असल्याचे समाजमाध्यमांवर बोलले जात आहे.