| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. १९ डिसेंबर २०२४
माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच 'ए आय'ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या आता ए आयच्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेसिंह यांनी केले आहे.
नागपूर प्रेस क्लब आणि माहिती जनसंपर्क नागपूर कार्यालयाच्या वतीने 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन जर्नालिझम' या विषयावर आयोजित कार्यक्रमात ब्रिजेश सिंह बोलत होते. जेष्ठ पत्रकार तथा माझे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे नागपूर, अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना ब्रिजेसिंह पुढे म्हणाले की, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोकऱ्या कमी होतील अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवीन नवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोकऱ्या गमावण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरताना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वतःला सिद्ध करावे लागेल. ए आय च्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रुट्या दुरुस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही सिंह यांनी यावेळी बोलताना दिला.