yuva MAharashtra सांगलीचा कुप्रसिद्ध शेरीनाला ठरला पुन्हा एकदा लक्षवेधी, दूषित पाणी पाठवले मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना !

सांगलीचा कुप्रसिद्ध शेरीनाला ठरला पुन्हा एकदा लक्षवेधी, दूषित पाणी पाठवले मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ डिसेंबर २०२
1970 च्या दशकात कुप्रसिद्ध शेरीनाल्यामुळे सांगली शहरात आलेल्या टायफॉईड साथीने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ही बातमी केवळ जिल्ह्यात अथवा राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात गाजली. त्यानंतरच्या तीन विधानसभा निवडणुका याच विषयावर लढावल्या आणि जिंकल्या गेल्या. याच विषयावर स्व. पै. संभाजी आप्पा पवार हे पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. आणि त्यानंतरच्या प्रत्येक सांगली विधानसभा, सांगली नगरपालिका आणि त्यानंतर अस्तित्वात आलेल्या सांगली महापालिकेच्या निवडणुकीत हा शेरीनाला कळीचा मुद्दा ठरला.

पावसाळा आला की या शेरीनाल्यातून कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी सोडले जाते. परिणामी त्या काळात साथीचे आजार बळावतात. ज्यांच्यावर जनतेच्या आरोग्याची मदार असते, ती सांगली महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ (जुजबी) उपाय करून, आपले कर्तव्य (?) बजावत असतात.

सध्या पुन्हा एकदा हा शेरीनाला चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या प्रश्नाकडे नव्या सरकारचे लक्ष वेधावं, म्हणून सांगली नागरिक जागृती मंच आक्रमक झाला असून शरीराला प्रकल्पाचे काम तात्काळ पूर्ण करावे यासाठी काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना कॅनमधून शेरी नाल्याचे पाणी आहेर म्हणून पाठवण्यात आले.


जागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ज्या ठिकाणी शेरीनाला कृष्णा नदीत मिसळतो, त्या महापालिकेच्या जागवेल जवळून दूषित पाणी कॅनमध्ये भरण्यात आले, आणि नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुरियर च्या माध्यमातून पाठवण्यात आले. यापैकी एक कॅन सांगली महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयातही पाठवण्यात आला आहे. त्यामुळे शेरी नाल्याचा हा प्रश्न कायमचा संपुष्टात यावा आणि सांगलीकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळाले हाच या मागचा उद्देश असल्याचे सांगली नागरिक जागृती मंचचे प्रमुख सतीश साखळकर यांनी पत्रकारांना सांगितले.

सतीश साखळकर यांचे मनोगत !



यावेळी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, उमेश देशमुख, मोहन चिरमुले, अविनाश जाधव, संजय चव्हाण, मयूर बांगर, अवधूत गवळी, गोपाळकृष्ण मर्दा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे हे उपस्थित होते.

फोटो व व्हिडिओ सौजन्य : सतीश साखळकर