| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ डिसेंबर २०२४
मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्यासोबत विचित्र कांड घडला आहे. एक पेढा खाणं व्यापाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. पेढा खाल्ल्यानंतर व्यापाऱ्याला ५० गमावावे लागले आहेत. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्यानं तातडीनं समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
कैलास चौधरी असं तक्रारदार व्यापाऱ्याचं नाव आहे. ते कांदिवली परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांचा किराणा मालाचा व्यवसाय आहे. झटपट पैसे दुप्पट करण्याच्या मोहामुळे त्यांना ५० लाख रुपये गमवावे लागले आहेत. पाच जणांनी घरात पुजापाठ आणि हातचलाखी करून व्यापाऱ्याला गंडा घातला आहे.
व्यापाऱ्यासोबत नक्की काय घडलं?
व्यापारी कैलास चौधरी यांनी समतानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच कांदिवली परिसरात ओम एन्टरप्रायजेस नावाचं किराणा मालाचं दुकान आहे. यातून त्यांची चांगली कमाई होत होती. मात्र त्यांना त्यांच्या प्रमोद डब्बू नावाच्या मित्रानं झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवलं. त्याने शिवकुमार यादव आणि त्याचे काही सहकारी झटपट पैसा दुप्पट करुन देतात, असं सांगितलं.
सुरुवातीला चौधरी यांचा प्रमोद यांच्यावर फारसा विश्वास नव्हता. पण आधी प्रात्यक्षिक बघा मग पैसे द्या, असं प्रमोदनं कैलास चौधरी यांना सांगितलं. त्यानुसार प्रमोद कैलास चौधरी यांना ऑक्टोबर महिन्यात गोरेगाव येथे घेऊन गेला होता. इथे एका खोलीत सूर्यबाबा, शिवकुमार यादव आणि त्यांचे काही साथीदार बसले होते. ज्यांना प्रात्यक्षिक बघायचं असेल त्यांनी वहीत पैसे ठेवावे आणि शांत बसावे, असं सूर्यबाबाने सांगितलं. त्यानुसार कैलास चौधरी यांनी आपल्या खिशातील शंभर-दोनशे रुपये वहीत ठेवले. यावेळी भोंदुबाबाने हातचलाखी करत हे पैसे दुप्पट केले. हा प्रकार पाहिल्यानंतर कैलास यांना विश्वास बसला.
यानंतर चौधरी यांनी आपल्याजवळील पैसे दुप्पट करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्याजवळील ३० लाख आणि मित्र व नातेवाईकांकडून घेतलेले २० लाख असे एकूण ५० लाख रुपये शिवकुमार यादवला दिले. पैसे दुप्पट करण्याच्या बाहण्याने आरोपींनी एका बंद खोलीत पूजापाठ करण्याचं ठरवलं. पूजापाठ झाल्यानंतर आरोपींनी चौधरी यांना एक पेढा खायला दिला. पण पेढा खाल्ल्यानंतर अवघ्या काही सेकंदात चौधरी बेशुद्ध झाले. यानंतर आरोपींनी भोंदुबाबा, शिवकुमार यादव आणि इतरांनी पैसे घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. जेव्हा चौधरी शुद्धीवर आले, तेव्हा ते कंगाल झाले होते, त्यांच्याकडे एक रुपयाही उरला नव्हता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास करत आहेत.