yuva MAharashtra मानसिंगराव नाईक यांनी घेतली अजित पवार यांची भेट, सांगली जिल्ह्यात राजकीय चर्चेस उधाण !

मानसिंगराव नाईक यांनी घेतली अजित पवार यांची भेट, सांगली जिल्ह्यात राजकीय चर्चेस उधाण !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ डिसेंबर २०२
शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आले आहे. या भेटीमुळे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील नेत्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिराळा व वाळवा तालुक्यातील काही नेत्यांनी मुंबईला धाव घेतली आहे.

शिराळा विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी मुंबईत अजित पवार यांची सोमवारी भेट घेतली. यावरून अनेक राजकीय तर्कवितर्क सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालातून पराभूत नेते सावरलेले नाहीत. त्यामुळे सत्तेत आलेल्या पक्षाचे नेतेही अस्वस्थ आहेत. अशावेळी मानसिंगराव नाईक मुंबईत अजित पवार यांना भेटल्याने वेगळी चर्चा सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

मानसिंगराव नाईक यांची प्रतिक्रिया

"मी अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र, आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. निकालावेळी त्यांचा मला फोन आला होता. 'मुंबईत आल्यावर भेटा', असे ते म्हणाले होते. त्यामुळे मुंबईत गेल्यानंतर त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी मोठ्या प्रमाणात शिराळा मतदारसंघासाठी विकास निधी दिला आहे. त्यांचे अभिनंदन करणे यात कोणतेही राजकारण नाही."
- मानसिंगराव नाईक, 
माजी आमदार

नाईक व पवारांचा जुना स्नेहभाव..

विधानसभा निवडणूक प्रचारात यावेळी मानसिंगराव नाईक यांना या मुद्यावरून बरीच टोलेबाजी सहन करावी लागली होती. पवार कुटुंबीय तसेच अजित पवार आणि मानसिंगराव नाईक यांच्यातील स्नेहभाव जुना आहे. आता पराभवानंतर त्यांनी अजितदादांची घेतलेली भेट त्यामुळेच अधिक चर्चेत आली. शिराळा मतदारसंघातील राजकारणात नवे वळण येणार आहे का ? याची चर्चा सुरू झाली आहे.