| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ डिसेंबर २०२४
कळवा-मुंब्रा विधानसभेतून आमदार बनलेले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादीचे (शरद पवार पक्ष) गटनेतेपदी, मुख्य प्रतोदपदी दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार पक्ष) जयंतराव पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक संपन्न झाली. या बैठकीत या नियुक्त्या करण्यात आल्या. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, कमी वयात मोठी जबाबदारी रोहित पाटील यांच्यावर शरद पवारांनी टाकल्याचं पाहायला मिळा तसेच, आमदार उत्तम जानकर यांना प्रतोदपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत निर्णय झाला नाही, आज ९ सदस्य उपस्थित होते, आजच्या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित नव्हते.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागा जिंकल्या आहेत. त्यात, तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील तर माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विधानसभेत पोहोचले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला अपेक्षित यश आलं नसून केवळ ४९ जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. त्यामध्ये, २० जागा जिंकून शिवसेना ठाकरे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेसने १७ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला केवळ १० जागांवर यश मिळालं. त्यामुळे, महायुतीमधील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळेल, एवढे संख्याबळ नाही. मात्र, महाविकास आघाडीमधील पक्षांकडून विधिमंडळ गटनेते आणि प्रतोदपदी पक्षातील नवनिर्वाचित आमदारांची नियुक्ती केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत बैठक घेऊन गटनेता व प्रतोद यांची निवड केली होती. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही गटनेता, मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
मुंबईतील ठाकरे गटाच्या आमदारांची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत भास्कर जाधव यांची विधानसभेतील पक्षाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली. तर, सुनील प्रभू यांना पुन्हा एकदा पक्षाचे प्रतोद बनविण्यात आले आहे. तर, आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.