फोटो सौजन्य - आ. पडळकर यांच्या फेसबुक वॉलवरुन...
| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. १९ डिसेंबर २०२४
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून सर्व परिचित असलेले जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या बातम्या विविध माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या. गेले दोन-तीन दिवस आ. पडळकर हेही दूर होते. मात्र आता आ. पडळकर यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर स्पष्ट केली असून, आपल्या पुढील कार्याची दिशा स्पष्ट केली.
पत्रकारांनी नाराजी बाबत विचारल्यानंतर बोलताना आ. पडळकर म्हणाले की, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला नाराजी दिसते का ? पक्षाने मला पहिल्यांदा विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली त्याचं मी सोनं केलं आहे. विधान परिषदेत महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे अनेक प्रश्न मी उपस्थित केले. रस्त्यावरची लढाई सुद्धा मी लढली आहे.
जत विधानसभेसाठी मला पक्षाने उमेदवारी दिली, माझ्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांनीही मला 40 हजाराचे मताधिक्य दिले. त्यामुळे मी नाराज असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ज्यांचे मी काम केले, त्यांना मी मंत्रिमंडळात अपेक्षित होतो. त्यामुळे मंत्रिमंडळातील माझ्या अनुपस्थिती बाबत कार्यकर्त्यांत व जनतेत नाराजी दिसून येत आहे.
मात्र पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे. यापुढे जनतेच्या व धनगर समाजाच्या प्रश्नावर मी पूर्णवेळ काम करणार आहे. केवळ धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतच नव्हे तर बहुजन समाज, ओबीसी, भटके विमुक्त समाजासाठीही मी काम करणार आहे. आपण पक्षाच्या समाजकार्यात आधीही होतो, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. तसेच देवाभाऊ, नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाव उमेद न होता भाजपा सोबत राहावे अशी माझी त्यांना विनंती आहे, असेही आ. पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना आवाहन केले.