yuva MAharashtra निवडणुकीच्या आखाड्यात 'धारातीर्थ' पडलेल्या पाच शिलेदारांना शिंदेंकडून दिलासा !

निवडणुकीच्या आखाड्यात 'धारातीर्थ' पडलेल्या पाच शिलेदारांना शिंदेंकडून दिलासा !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ डिसेंबर २०२
निवडणूक म्हटले की जय-पराजय आलाच. पराभूत झालेल्या सहकाऱ्यांची सर्वच पक्षांकडून दखल घेतली जाते का, त्यांना बळ दिले जाते का, हा महत्वाचा प्रश्न आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आपल्या पक्षातील या सहकाऱ्यांची दखल घेतली आहे. त्यांना मुंबईत बोलावून घेऊन पराभवाची कारणे जाणून घेत त्यांना न्याय देण्याचे, बळ देण्याचे आश्वासन दिले आहे.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री बनले. तत्पूर्वी, ते सूरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत 40 आमदार होते. यापैकी एकही आमदार पराभूत झाला तर मी राजकारण सोडणार, अशी घोषणा शिंदे यांनी नंतर एका कार्यक्रमात केली होती. त्यावरून विरोधकांकडून शिंदे यांना लक्ष्य केले जात आहे.

समाजमाध्यमांतूनही शिंदे यांना, आता राजकारण सोडून गावी कधी जाणार, असा प्रश्न विचारला जात आहे. आपल्यासोबत आलेल्यांना धीर देण्यासाठी अशा घोषणा कराव्या लागतात. राजकारण कुणी सोडत नसते, ही वस्तुस्थिती आहे.


शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्यांमध्ये ज्ञानराज चौगुले (उमरगा-लोहारा), शहाजी पाटील (सांगोला), संजय रायमुलकर (मेहकर), सदा सरवणकर (माहीम), यामिनी जाधव (भायखळा) यांचा विधानसभेच्या या निवडणुकीत पराभव झाला. या सर्वांनी शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या माजी आमदाराची विशेष बैठक बोलावली होती. या सर्वांच्या पराभवाची कारणे त्यांनी जाणून घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जोमाने कामाला लागण्याची सूचना शिंदे यांनी केली.

शिवसेना तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. जोमाने कामाला लागा, तुम्हाला न्याय देऊ, बळ देऊ, असे खासदार शिंदे यांनी या पराभूत उमेदवारांना आश्वस्त केल्याचे सांगितले जात आहे. गुवाहाटीला गेलेले शहाजी पाटील हे काय झाडी, काय हॉटेल, काय डोंगार...या संवादामुळे राज्यभरात ओळखले गेले होते.

सांगोला मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. सलग दोनवेळा विजयी झालेले सदा सरवणकर यांचा माहीम मतदारसंघातून पराभव झाला. तिरंगी लढतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महेश सावंत यांनी त्यांचा पराभव केला.

मेहकर विधानसभा मतदारसंघातून संजय रायमुलकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिद्धार्थ खरात यांनी पराभव केला. भायखळा मतदारसंघात यामिनी जाधव या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनोज जामसुतकर यांच्याकडून पराभूत झाल्या. उमरगा - लोहारा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी यांनी पराभव केला. शिंदे यांना साथ दिलेले प्रहारचे बच्चू कडू आणि अपक्ष गीता जैन यांचाही पराभव झाला आहे.

उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये आरक्षित झाला. त्यानंतर झालेल्या सलग तीन निवडणुकांमध्ये ज्ञानराज चौगुले हे विजयी झाले होते. चौगुले हे एकनाथ यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर शिंदे यांनी चौगुलेंना मंत्रिमंडळात घेण्याचा शब्द दिला होता. या निवडणुकीत विजयी झाले असते तर चौगुले यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात होता, मात्र त्यांचा पराभाव झाला आहे. आता या शिलेदारांना शिंदे कशा पद्धतीने बळ देतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.