yuva MAharashtra स्व. बाबगोंडा भुजगोंडा पाटील :जैन समाजाचा कर्तबगार नेता !

स्व. बाबगोंडा भुजगोंडा पाटील :जैन समाजाचा कर्तबगार नेता !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ डिसेंबर २०२
आज १२ डिसेंबर.. स्व. बाबगोंडा भुजगोंडा पाटील यांचा १३६ वा जन्मदिन..! 

सांगली जिल्ह्यातील समडोळी गावात चतुःसंघानं प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांना आचार्यपदावर आरुढ केलं हे समडोळीचे पहिले आगमरक्षक ऐतिहासिक कार्य. आणि दुसरे याच गावच्या स्व. दादा पाटील घराण्यानं बाबगोंडा हा कर्तबगार पुत्र दिला ज्यांनी दक्षिण भारत जैन सभा आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या जडणघडणीत भरीव योगदान दिले.

स्व. बाबगोंडा दादा पाटील हे भुजगोंडा पाटील यांना दत्तक गेले त्यामुळे ते बाबगोंडा भुजगोंडा पाटील झाले. आई रुक्मिणी व वडील दादा यांनी जैन समाजाला बाबगोंडा हा कर्तबगार पुत्र दिला.त्यांनी समाजाला दिलेली ही सर्वोत्तम भेट आहे. कारण जैन धर्म, जैन संस्कृती, जैन तत्वज्ञान, जैन साहित्य व जैन इतिहास या विषयावर आयुष्यभर बाबगोंडानी लेखणी झिजवली आणि जैन अस्तित्व व अस्मिता काय चीज आहे हे दाखवून दिले आहे.


बाबगोंडा पाटील हे दक्षिण भारत जैन सभेचे माजी विद्यार्थी. कर्मवीर भाऊराव पाटील आणि बाबगोंडा हे सभेच्या कोल्हापूर जैन बोर्डिंगच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी. सांगली हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी. याच हायस्कूल मधून ते चांगल्या गुणांनी मॅट्रिक उत्तीर्ण झाले.

मुंबईत हिराचंद गुमानजी जैन बोर्डिंगमध्ये राहून विल्सन काॅलेज मधून ते इतिहास व अर्थशास्त्र विषयात बी. ए. झाले. १९२० मध्ये ते एल. एल. बी. होऊन सांगलीत वकिली व्यवसाय सुरू केला. कोल्हापूर जैन बोर्डिंग मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सान्निध्यामुळे जातीभेदाविरुध्द काम करण्याची इच्छा निर्माण झाली. सांगलीत त्यांनी हरिजन विद्यार्थ्यांच्या हितासाठी डॉ. बापट वसतिगृह सुरु करुन १९२२ ते १९५५ अखेर सलग ३३ वर्षे काम पाहिले.

बाबगोंडा यांनी दक्षिण भारत जैन सभेची १९२२ ते १९४६ अशी २४ वर्षे सेवा केली होती. ते सभेचे महामंत्री व चेअरमन होते. याकाळात सभेला व जैन श्राविकाश्रमाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते सभेचे मुखपत्र प्रगती आणि जिनविजयचे १९२४ ते १९४६ पर्यंत २२ वर्षे संपादक होते. या काळात त्यांनी लिहिलेले अग्रलेख जैन समाज परिवर्तन घडवून आणले.

बाबगोंडा हे जसे नावाजलेले वकील होते तसेच ते अभ्यासू, व्यासंगी व विचारवंत सिध्दहस्त लेखक होते. ऐतिहासिक जैन वीर, रत्नकरंड श्रावकाचार, दक्षिण भारत जैन व जैन धर्म, महावीर- वाणी, रायबाग - हुविनबागे, अहिंसा, जैन हे हिंदू नव्हेत, भगवान महावीरांचे महावीरत्व आणि सम्राट खारवेल असे नऊ विचारप्रवर्तक ग्रंथ त्यांनी अक्षरबद्ध केले आहेत. 

जैन समाजात ज्ञानाचा प्रसार व्हावा, समाजाला आपल्या स्वत्वाची जाणीव व्हावी म्हणून त्यांनी सभेतर्फे १९१२ मध्ये दक्षिण महाराष्ट्र जैन सभा ट्रॅक्टमाला ही ग्रंथमाला सुरु केली.१९३४ मध्ये दक्षिण महाराष्ट्र जैन सभा ग्रंथमाला असे नामकरण करण्यात आले. त्यांनी स्वतःच ग्रंथ लिहून प्रकाशित केले. त्याचा जैन समाजाला चांगला फायदा झाला. दक्षिण भारत जैन सभेने त्यांचे स्मारक म्हणून १९५५ मध्ये ग्रंथमालेचे श्री. बा. भु. पाटील ग्रंथमाला असे नामकरण करुन २५ हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. 
बाबगोंडा पाटील यांनी जे ग्रंथ लिहिले त्यासाठी अनेक संदर्भ ग्रंथ जमविले, त्यांचा बारकाईने अभ्यास केला. 

दक्षिण भारतात जैन धर्म व इतिहासावर एकही ग्रंथ उपलब्ध नसताना त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व संशोधनपर ग्रंथ लिहिल्याने त्यांच्या 'दक्षिण भारत जैन व जैन धर्म' या ग्रंथामुळे 
ते आद्य जैन इतिहासकार ठरतात. सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या लेखनात व्यावहारिक उदाहरणे असल्याने अत्यंत क्लिष्ट तत्वज्ञान चटकन वाचकांना कळते. 

बाबगोंडा पाटील हे ब्राम्हणेतर समाजाचे पुढारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विरोधक म्हणून ख्यातकीर्त होते. अन्यायाविरुद्ध लढणे ही त्यांची खासीयत लक्षात घेऊन सांगली संस्थानने त्यांना १९३४ साली पब्लिक प्राॅसिक्युटर व गव्हर्न्मेंट प्लिडर म्हणून नेमले होते. १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले, त्यावेळी त्यांनी आरोपींच्या वतीने वकीलपत्र घालून अनेकांना आर्थिक मदतीसह त्यांना दोषमुक्त केले. त्यामुळे ते देशभक्त वकील ठरतात. 

सांगली जैन बोर्डिंगच्या विद्यार्थ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्यावेळी त्यांनी जैन समाजाच्या आदेशानुसार सरकारी वकील पदाचा राजीनामा देऊन सांगली दरबाराशी झगडण्याचे धाडस दाखविले म्हणून ते खरे जैन ठरतात. सांगली संस्थानच्या रयत असेब्लीचे अर्थमंत्री व विकास मंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांचा विकास केला. 

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कायद्यात दुरुस्ती करुन शेतकऱ्यांचा फायदा करुन दिला. 
औद्योगिक व आर्थिक क्षेत्रात त्यांनी उठावदार काम केले होते. रत्नाकर इंडस्ट्रीज लि. कोल्हापूर व दि महाराष्ट्र मेटल अँड जनरल वर्क्स लि. सांगली हे कारखाने काढून त्यांनी औद्योगिक विकासाला चालना दिली. सांगलीत विट कारखाना, ताड व घायपातापासून दोरखंड निर्मिती, पोह्याचा कारखाना असे उद्योग सुरु करुन उद्योगधंद्यात यश मिळविले म्हणून ते सांगलीच्या औद्योगिक विकासाचे जनक ठरतात. 

आज २८ जिल्ह्यात विस्तारलेल्या व १७ हजार अधिकारी व कर्मचारी असलेल्या रत्नाकर बँकेची स्थापना त्यांनी १९४३ मध्ये केली. ते या बँकेचे पहिले आणि सलग १३ वर्षे चेअरमन राहिले. या बँकेच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना आर्थिक बळ मिळाले त्याचे श्रेय प्रामुख्याने बाबगोंडा पाटील यांनाच जाते. 

बाबगोंडा पाटील हे दि. ब. आण्णासाहेब लठ्ठे यांना गुरुस्थानी मानत. लठ्ठे यांचा गौरव करण्यासाठी लठ्ठे गौरव निधीची संकल्पना ही त्यांचीच होती. या गौरव निधिला त्यांनी रु. ३ हजाराची देणगी दिली होती. दुर्दैवाने गौरव होण्याआधी लठ्ठे यांचे निधन झाले. जमलेल्या गौरव निधीतून लठ्ठे यांचे स्मारक म्हणून लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात स्व. बाबगोंडा पाटील, स्व. श्रीमंतीबाई कळंत्रे आक्का, प्राचार्य जी. के. पाटील,स्व. बाळा चंदाप्पा धावते,स्व. नाभिराज रुकडे, स्व. जी. बी. दुग्गे, स्व. फडेप्पा गुंजाळ,स्व. मगनलाल शहा, स्व. आर. सी. जैन या नऊ संस्थापकांनी पुढाकार घेतला होता. या संस्थेच्या रजिस्ट्रेशनसाठी बाबगोंडा पाटील यांनी नोंदणी व प्रवास खर्चासाठी स्वतःच्या खिशातून पैसे दिले होते ही घटना निःस्वार्थी व सेवाभावी विश्वस्त कसा असतो याची निदर्शक आहे. 

आज पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे शैक्षणिक कार्य उत्तमप्रकारे सुरु आहे. या संस्थेच्या कार्यात बाबगोंडा यांच्या नंतर त्यांचे बंधू स्व. नेमगोंडा व स्व. राजमती पाटील, पुत्र स्व.आण्णासाहेब पाटील व नातू स्व. अशोक पाटील यांचे चांगले योगदान आहे. दुसरे नातू दिपक पाटील हेही संस्थेत सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत. लठ्ठे संस्थेच्या माध्यमातून अनेकांच्या चुली पेटल्या. बहुजन समाज शिकून स्वावलंबी झाला. या रचनात्मक कार्यात बाबगोंडा पाटील व संस्थापक सदस्यांनी आर्थिक झीज सोसून दिलेले योगदान लक्षवेधी आहे.

१९५४ साली वयाच्या ६७ व्या वर्षी बाबगोंडा पाटील यांचा सांगली जैन बोर्डिंगमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांचे शिष्य स्व. केशवराव चौगुले वकील, बाबगोंडा पाटील यांचा परिचय करून देताना म्हणाले, 'नामदार लठ्ठे म्हणत असत की, सभेने काय कार्य केले आहे, असे जर कोणी विचारले तर तुम्ही एवढेच सांगा की, सभेने बाबगोंडा पाटील वकील व कर्मवीर भाऊराव पाटील ही दोन' थोर माणसे' 
निर्माण केली!

जैन समाजाला मोकळा श्वास घेता यावा, आपले अस्तित्व व अस्मिता जपता यावी यासाठी कार्याचा डोंगर उभा करुन जैन समाजाच्या या कर्तबगार नेत्यांने १९ मार्च, १९५५ रोजी अखेरचा श्वास घेतला. 

सांगली संस्थान, दक्षिण भारत जैन सभा, जैन श्राविकाश्रम, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, रत्नाकर बँक, जैन साहित्य निर्मिती , डॉ. बापट हरिजन विद्यार्थी वसतिगृह इ. संस्था आणि धार्मिक, शैक्षणिक, कृषी, उद्योग, आर्थिक आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रातील बाबगोंडा पाटील यांचे कार्य अवाढव्य आहे. नव्या पिढीला त्यांचे चरित्र प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याने त्याचा अभ्यास करावा ही अपेक्षा करणे उचित ठरेल. 
दक्षिण भारत जैन सभा, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी आणि जैन समाजोन्नतीच्या कार्यात जमेल तेवढे योगदान देत राहणे हेच खरे बाबगोंडा पाटील यांना अभिवादन होय. 

प्रा. एन.डी.बिरनाळे 
महामंत्री (सांगली) 
दक्षिण भारत जैन सभा