yuva MAharashtra आपल्या मागं ज्यांनं रडावं, असं आपल्याला वाटत असेल, त्याला आपल्या जिवंतपणी हसवावं लागतं...!

आपल्या मागं ज्यांनं रडावं, असं आपल्याला वाटत असेल, त्याला आपल्या जिवंतपणी हसवावं लागतं...!


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १८ डिसेंबर २०२
जगण्या आणि जगवण्याच्या लढाईमध्ये आज पर्यंत माझे सहा एक्सीडेंट झाले आहेत... 

जीव वाचला; परंतु कमरेच्या मणक्यात आणि मानेच्या मणक्यात सहा गॅप आहेत... ! 

मध्ये मध्ये ही दुखणी लहान बाळासारखी रडायला लागतात, परंतु जो जो रे बाळा जो म्हणत, मी त्यांना मनातल्या मनात बऱ्याच वेळा झोपवतो... ! 

परंतु थंडीच्या दिवसांमध्ये हाडांची हि काही दुखणी स्वतःही झोपत नाहीत आणि मलाही झोपू देत नाहीत... 

डाव्या हातात मुंग्या येतात.... मानेपासून डावा हात इतका दुखतो; की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.... ! 

या त्रासामुळे मोटरसायकल चालवताच येत नाही....  

आणि त्यामुळे बऱ्याच वेळा फिल्डवर, भिक्षेकर्‍यांमध्ये जाणे मनाविरुद्ध रद्द करावे लागते.... ! 

मागील महिन्यात दोन-तीन सुट्ट्या अशाच मनाविरुद्ध पडल्या... 

तिथल्या आज्यांना औषधे देता आली नाहीत हि एक तळमळ... आणि जीव घेण्या पद्धतीने डावा हात दुखतोय ही दुसरी तळमळ... 

दुहेरी कात्रीत मी सापडलो होतो. 

आज सोमवारी 16 तारखेला मात्र गेलो... 

मला काय त्रास होतो आहे, याची अर्थातच त्यांना कल्पना नव्हती.... ! 


खूप दिवसातून मी त्यांना भेटत होतो.... 

मला बघितल्यावर मग, हात वारे करून माझ्याशी त्या हक्काने कचकचून भांडायला लागल्या...! 

आमी काय मरायचं का ? तू काय सोताच्या मनाचा मालक हाय का ? तुला काय लाज हाय का ? वगैरे वगैरे...

शंभर गोष्टी त्यांनी मला सुनावल्या... ! 

माझा डावा हात अजूनही नीट उचलत नाही.... तरीही मी मोटरसायकल चालवत गेलो होतो.... ! 

उजवा हात माझ्या डाव्या छातीवर ठेवून, अभिवादन करून, मी त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं, 'माज्या मानंच्या मणक्यामदल्या शिरा चीमटल्या हायेत... 
माजा डावा हात नीट काम करत न्हायी... तरीबी तुमच्यासाठी गाडी चालवून हितपर्यंत आलो... फकस्त तुमच्यासाटी... ! 
आणि तुमि माज्याशी भांडायला लागला...' मी काकुळतीने बोललो... ! 

हि वस्तुस्थिती ऐकल्यानंतर त्यांचा चेहरा मात्र लगेच बदलला...  

श्रावणात उन्हं असताना पाऊस पडतो आणि पाऊस पडताना लगेच उन्हं पडतात...

माझ्या बोलण्यानंतर, रागे भरलेल्या डोळ्यांमध्ये आता पाऊस साठला होता...

क्षणात मोसम बदलला होता...! 

श्रावणाचा महिना नसताना सुद्धा, भर थंडीतही, मावश्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा पाऊस माझ्या खांद्यावर पडला... ! 

एकीने खांदा चोळला ... 
एकीने डावा हात हातात घेऊन त्याला मालिश केले... 
एकीने डोक्यावर हात ठेवून आला-बला काढली... ! 

साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर मी... पण माझ्या लोकांनी आज मला एखादा राजकुमार असल्याचा फील दिला.... ! 

मी आपला सहज बोलून गेलो, 'एक महिना नाही आलो तर इतकं बोलता... 

मी जर मेलो बिलो आणि कधी आलोच नाही तर काय कराल ?'

या वाक्याने त्यांचा बांध फुटला... 

श्रावणाने पुन्हा मौसम बदलला...! 

एक रडायला लागली, डॉक्टरला मरू नको देऊ म्हणून तिने मंदिरापुढे अश्रूंचा अभिषेक केला...

एकीने रडत देवाला कौल लावला ...  

एक आजी रडत देवाशी चक्क भांडायला लागली, "डाक्टरच्या" मणक्यात गॅप दिल्याबद्दल ती त्याला दोष देत होती.... ! 

मी भारावून गेलो... माझ्या डोळ्यात पाणी आलं...! 

मला खूप पूर्वी वाटायचं, आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी मनापासुन रडेल का ? 

आपण मेल्यावर आपल्यासाठी कोण कोण रडतं ? हे पाहायची काही सोय आहे का ? 

आता, हा प्रसंग पाहिल्यानंतर, माझ्या मृत्यू मागे कोण कोण रडणार याची नोंद माझ्या मनात झाली होती... !

मेल्यावर माझ्या माघारी रडणारी माणसं, आज मी माझ्या जिवंतपणे पाहिली.... ! 

*पण जाणीव झाली, आपण मेल्यावर आपल्या मागं ज्यांनं रडावं, असं आपल्याला वाटत असेल, त्याला आपल्या जिवंतपणी हसवावं लागतं...!* 

It's damn reality.... !!!

असो...

मी माझ्या व्याख्यानात नेहमी म्हणतो.... आपल्याला जेव्हा काहीतरी दुखतं खुपत् त्यावेळी आपल्या वेदना होतात आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं .... 

परंतु जेव्हा दुसऱ्याला वेदना होतात आणि तरीही आपल्या डोळ्यात पाणी येतं... त्याला संवेदना म्हणतात ... समवेदना म्हणतात.... ! 

या माझ्या आज्या - मावश्या आज माझ्यासाठी रडल्या... यात मला आनंद नाही...

माझी वेदना; त्यांनी संवेदना आणि समवेदना म्हणून स्वीकारली... यात आनंद आहे ! 

वेदनेपासून संवेदनेकडचा आणि समवेदनेकडचा प्रवास त्यांचा सुरु झाला आहे यात मी सुखी आहे.... ! 

आता मी कधीही गेलो तरी सुद्धा, आज्यांच्या प्रार्थनेच्या हातात मी जिवंत असेन; याची मला जाणीव आहे.... 

आता माझ्या मागे कोण कोण रडेल याची मला फिकीर नाही.... !

माझ्या जाण्यानंतरचा सोहळा आज मी जिवंतपणे पाहिला...!!! 

डॉ अभिजीत सोनवणे
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट पुणे
9822267357
*sohamtrust2014@gmail.com