| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० डिसेंबर २०२४
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या तथाकथित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्यावरून, काँग्रेसने देशभरात निषेध आंदोलन सुरू केले आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाची झाली असून त्याचे पडसाद काल मुंबईतील किल्ला कोर्टाच्या समोर असलेल्या काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करून उमटले.
मुंबईचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजेन्दरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी हा प्रकार घडला. काँग्रेस कार्यालयात घुसल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केल्याचे सांगितले जाते. यावेळी सोनिया गांधी, प्रियांका गांधी व राहुल गांधी यांच्या पोस्टरवर काळी शाई फेकण्यात आली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
या घटनेचा काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध केला असून भाजपाकडून पोलिसांच्या आडून हा हल्ला केला असल्याचा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेस कडून करण्यात आला आहे. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व अशा रीतीने पुन्हा एकदा लढ्याचे केंद्रस्थान बनले आहे. हे प्रकार तात्काळ थांबवण्यात यावेत अशी मागणी आता आंबेडकरवादी संघटनांकडून करण्यात येत आहे.