| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० डिसेंबर २०२४
दक्षिण भारत जैन सभेचे शेठ रा. ध. धावडा दिगंबर जैन बोर्डिंग तर्फे 19 वा जैन वधू वर पालक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन अण्णासाहेब चकोते व त्यांच्या विविध पत्नी सौ पद्मिनी चकोते यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अण्णासाहेब चकोते म्हणाले की लग्न ठरविताना पालकांनी तडजोडीची भूमिका घ्यायला हवी. वधू वर मेळाव्याचे समाजाला नितांत गरज असून, अशा मेळाव्यामधून एकाच वेळी अनेक अनुरूप स्थळे पाहता येतात. यामुळे आपला वेळ, पैसा वाचतो. जैन बोर्डिंग ने एक उत्तम प्रकारचे पाऊल उचलले आहे असे मत चकोते यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दक्षिण भारत जनसभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, इच्छुक वधू वरांनी या मेळाव्याद्वारे अनुरूप जोडीदार निवडावा असे आवाहन केले. तसेच त्यांनी बोर्डिंगच्या या उपक्रमाचे कौतुक करून या मेळाव्यामुळे जैन समाजामधील विवाह इच्छुक तरुण-तरुणींना अनुरूप जोडीदार मिळेल अशी खात्री व्यक्त केली.
यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन भाऊसाहेब जनगोंडा पाटील यांनी आपला मनोगत मध्ये सांगली जैन बोर्डींग हे दक्षिण भारत जैन सभेची एक महत्त्वपूर्ण शाखा असल्याचे सांगून बोर्डिंगच्या वधू वर मेळाव्यास उत्तम प्रतिसाद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
जैन बोर्डिंगचे चेअरमन प्रा. राहुल चौगुले यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये, 19 व्या वधू वर मेळाव्याला 1200 उमेदवाराची नोंदणी झाली असून, भारत वर्षातील सामाजिक तत्त्वावर संपन्न होणारा हा कदाचित सर्वात मोठा वधू वर मेळावा असल्याचे सांगितले. या मेळाव्यासाठी मागील चार महिन्यापासून शेकडो कार्यकर्ते कष्ट घेत असून, मेळाव्याचा प्रचार आणि प्रसार विविध माध्यमे व समाज माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्याचे सांगून प्रा. चौगुले म्हणाले की, रंगीत छायाचित्रासह वधू-वरांची संपूर्ण माहिती असलेल्या पुस्तकाचे वितरण सुरू झाल्याचेही प्रा. चौगुले यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी जैन बोर्डिंग च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
याप्रसंगी वधू-वर पालक परिचय मेळावा पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थित त्यांचे स्वागत बोर्डिंगचे सेक्रेटरी ॲड. मदन पाटील यांनी केले. तर जॉ. सेक्रेटरी संदीप हिंगणे यांनी पाहुण्यांचे ओळख करून दिली. शेवटी वधुवर सूचक मंचचे सचिव विशाल चौगुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या मेळाव्यासाठी जैन महिला परिषद, कळंक्रे अक्का जैन महिलाश्रम, स्नेहजोत महिला मंडळ, वीर सेवा दल तसेच बोर्डिंगचे पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन हा मेळावा यशस्वीपणे पार पाडला. वधू वर मेळाव्यासाठी बोर्डिंगचे व्हा चेअरमन प्रशांत अवधूत, सुपरिटेंडेंट राजेश पाटील, जॉ. सुपरिटेंडेंट प्रवीण वाडकर, मेळाव्याचे अध्यक्ष बी. के. पाटील (अकोलकर), उपाध्यक्ष सौ. अनिता पाटील, जॉ. सेक्रेटरी श्रीमती छाया कुंभोजकर, यांच्यासह जैन बोर्डिंग चे सर्व सदस्यांनी परिश्रम घेऊन यशस्वी केला.