| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ डिसेंबर २०२४
सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेचे तत्कालीन नितीन कापडणीस यांनी शहरात प्रकर्षाने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबवली. या अंतर्गत महापालिका क्षेत्रात वृक्ष लागवड मोहीम हाती घेऊन याची सुरवात तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी केली. सांगली-मिरज मार्गावरील तुळुनाड भवन मागील वसंत कॉलनीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन हजार झाडे लावून साकारलेल्या आठवण उद्यान आकारास आले. यासाठी महापालिकेने प्रत्येक कर्मचाऱ्यास या वनराईतील एक-एक झाडे दत्तक दिले होते. शिवाय त्यांच्याच हस्ते हे वृक्ष लागवडी मोहीम राबवली होती.
पण सध्या येथील झाडे पाणी आणि देखरेखी विना मरणासन्न अवस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे या आठवण उद्यानातील झाडांचे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनाच विस्मरण झाले आहे की काय ? अशी शंका या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
या वनराईत पिंपळ, वड, जांभूळ, आंबा यासह तब्बल २ हजार झाडे आहेत. मात्र, सध्या या झाडांनी माना टाकण्यास सुरवात केली आहे. शिवाय वसंत कॉलनीचा खुला भूखंड महापालिकेने वनराई म्हणून वापरला आहे. यामुळे येथील नागरिकांना विरंगुळ्यासाठी मिरज किंवा सांगलीतील उद्यानात जावे लागत आहे. येथील उद्यान विकसित केले तर या प्रभागातील नागरिकांना एक चांगले उद्यान मिळू शकेल. सध्यातरी तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आठवण उद्यानातील वनराईस कर्मचाऱ्यांनीच केराची टोपली दाखवली आहे. पुन्हा ३१ डिसेंबर २०२४ येत आहे. यावेळी तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना झाडांची आठवण येणार का ? असा सवाल नागरिक करीत आहेत.