| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ डिसेंबर २०२४
स्वयंम आर्ट फेस्टिवल म्हणजे विशेष विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे अनोखी व अद्वितीय उधळण आहे असे उद्गार क्रीडाई सांगली शाखेचे अध्यक्ष जयराज सगरे यांनी काढले. बौद्धिक अक्षम अशा विशेष मुलांच्या स्वयम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तयार केलेल्या कलात्मक पेंटिंग्सचे 'स्वयम आर्ट फेस्टिवल'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. इंडियन रेड क्रॉस सोसायटी कोल्हापूर जिल्हा शाखा, इंजिनीअर्स अँड आर्किटेक्ट्स असोसिएशन सांगली व आभाळमाया फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन जयराज सगरे यांच्या हस्ते तसेच इंजिनीअर्स अँड आर्किटेक्ट्स असोसिएशन सांगलीचे अध्यक्ष किरण टाकवेकर व आभाळमाया फाउंडेशनचे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
विशेष मुलांनी आपल्या कलाविष्काराने तयार केलेले ८० पेंटिंग्स या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहेत. नेहमी पेंटिंग करणाऱ्या सक्षम विद्यार्थ्यांपेक्षा या विद्यार्थ्यांनी केलेले पेंटिंग्ज अतिशय सुंदर आहेत, असे मनोगत ख्यातनाम आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी व्यक्त केले. या विशेष विद्यार्थ्यांना विशेष जाणीव असून त्यांच्या विचारांनी घेतलेली भरारी या पेंटिंग्जच्या माध्यमातून व्यक्त होते असे चौगुले म्हणाले. सांगलीकरांनी हे अनोखे प्रदर्शन अवश्य पहावे असे मनोगत किरण टाकवेकर यांनी व्यक्त केले.
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या विशेष कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रदर्शनास भेट देऊन विशेष विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमास क्रीडाईचे सचिव दिलीप पाटील, खजानिस इमरान मुल्ला, संचालक सुरेश केरीपाळे, क्रीडा एक्सपो प्रमुख जयेश हरिया, रेड क्रॉस चेअरमन श्रीनिवास मालू, सेक्रेटरी निरंजन वायचळ, खजानिस अमरदीप पाटील उपस्थित होते. हे प्रदर्शन दि.८ डिसेंबर २०२४ पर्यंत सांगलीतील इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट्स असोसिएशनच्या सुरजमल लुंकड आर्ट गॅलरी येथे सुरु असणार आहे. सांगलीकरांनी हे अनोखे व नाविन्यपूर्ण प्रदर्शन अवश्य पहावे असे आवाहन प्रमोद चौगुले यांनी केले आहे.