| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० डिसेंबर २०२४
सांगली समाचार वेब पोर्टलच्या कालच्या बातमीपत्रात, सांगलीतील झुलेलाल चौकातील बेशिस्त वडाप रिक्षावाल्यांच्या मुजोरपणावर प्रकाशझोत टाकला होता. परंतु या मुजोर वडाप रिक्षावाल्याप्रमाणेच येथील ठाण मांडलेल्या फळ विक्रेते व खाद्यविक्रेतेही तितकेच जबाबदार आहेत. परंतु वाहतूक विभागाप्रमाणेच सांगली महापालिकेचा अतिक्रमण विभागही तितकाच जबाबदार आहे.
सध्या सांगलीतील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु ज्यांची ही अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी आहे, तो सांगली महापालिकेचा अतिक्रमण विभाग कोमात गेला आहे की काय अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सांगली शहरातील मेन रोड, हरभट रोड, दत्त मारुती रोड या महत्त्वाच्या रस्त्यावर फळ विक्रेते, भाजीविक्रेते यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूकीस अडथळा होत आहे. पादचाऱ्यांना तर येथून जीव मुठीत धरून चालावे लागते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी मंडई व छत्रपती शिवाजी पुतळा परिसर, अतिक्रमणांनी वेढला गेला आहे.
अशाच पद्धतीने सांगली शहराचे नाक असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकाभोवतीही अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. मात्र शहरातील सर्वच अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे येथील अतिक्रमणाकडेही कानाडोळा केला जात आहे. मध्यंतरी छत्रपती शिवाजी मंडई परिसरात एका निष्पाप नागरिकास आपले प्राण गमवावे लागले होते. त्याचप्रमाणे आता मध्यवर्ती बस स्थानका शेजारील झुलेलाल चौकामधील अतिक्रमानाचा फटका या परिसरातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना बसत आहे.
वाहतूक पोलीस विभाग व सांगली महापालिका अतिक्रमण विभाग यांना या झुलेलाल चौकातील अतिक्रमणाचे कोणतेच सोयर सुतुक नसल्याचे संतापजनक चित्र दिसत असून त्यातून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे सांगलीचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब व महापालिकेचे लोकप्रिय आयुक्त शुभम गुप्ता यांनीच येथील अतिक्रमण हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांतून मागणी होत आहे.