| सांगली समाचार वृत्त |
बीड - दि. ३१ डिसेंबर २०२४
बीड चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी संशयाची सुई ज्याच्याभोवती फिरत होती तो वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला. पण यामुळे अजूनही प्रश्नांचे जंजाळ दूर होत नाही. संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी अशा गर्तेत कराड सापडला आहे. याप्रकरणी अजितदादांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे हेही या प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहेत. अर्थात या साऱ्या प्रकरणाशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आहे का ? की जवळचा कार्यकर्ता म्हणून त्यांना दोषी धरले जात आहे ? या प्रश्नांची जशी उत्तरे जनतेला हवी आहेत, तशीच बीड व परळी नेमके कशामुळे पेटले ? भाजपचे आमदार अंतर्गत राजकारणातून त्यांच्यावर शरसंधान करीत आहेत का ? अशा प्रश्नांनीही सर्वांच्या मनात घर केले आहे.
वाल्मिकी कराड याने सीआयडी ला शरण जाण्यापूर्वी जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये त्याने आपण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दोषी नसल्याचे, तसेच जर मी दोषी आढळतो तर मला जाहीर फाशी द्यावी असेही त्याने म्हटले आहे. आणि मग जर दोषी नव्हता तर तो फरार का झाला याची उत्तरे आता पुढे यायला हवीत.
दरम्यान शिवसेनेचे आमदार व नेते यांनी एक शंका उपस्थित केली असून, कालच धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आणि आज वाल्मीक कराड यांनी स्वतःला सीआयडीच्या ताब्यात दिले. यामागे काही योगायोग आहे का ? असा सवाल उपस्थित केला आहे.
बीड असो, परळी असो अथवा कोणतेही शहर. सध्या राजकीय आणि गुन्हेगारीच्या साटेलोट्यातून महाराष्ट्र बदनाम होतो आहे. अर्थात गुन्हेगारी आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप हा आत्ताचाच नव्हे, तर तो गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे. पक्ष कोणताही असो, सत्ताधारी कोणीही असो, किंवा आमदार कुठल्याही पक्षाचा असो. महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेशच्या दिशेने जात असल्याचा आरोप, सुसंस्कृत, उच्च परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राला शोभणारा नाही हे मात्र निश्चित.