| सांगली समाचार वृत्त |
कुपवाड - दि. २० डिसेंबर २०२४
गेली ५२ वर्षे कुपवाड व पंचक्रोशीच्या बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य बहाल करुन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना स्वाभिमानी व स्वावलंबी करणारे शिक्षणसंस्थाचालक आण्णासाहेब उपाध्ये हे कुपवाडचे कर्मवीर आहेत असे गौरवोद्गार प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी काढले. नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या ५३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
प्रास्ताविकात आण्णासाहेब उपाध्ये यांनी संस्थेच्या ५२ वर्षाची खडतर वाटचाल सांगताना बालवाडी पासून इंग्रजी व मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा विस्ताराची दमदार वाटचाल विषद केली. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करुन संस्थेतून आदर्श नागरिक घडवले जातात. स्टाफ झोकून देऊन काम करतो असेही ते म्हणाले.
प्रा. एन.डी.बिरनाळे व आण्णासाहेब उपाध्ये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मान्यवरांना दिलेली मानवंदना शिक्षण क्षेत्राची मान ताठ करणारी होती. उपस्थित मान्यवरांनी प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन केले.
आशालता उपाध्ये गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यीनींनी सुरेल आवाजात ईशस्तवन सादर केले. मान्यवरांच्या सत्कारानंतर संस्थेच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.कांही विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
प्रा. बिरनाळे पुढे म्हणाले, आण्णासाहेब उपाध्ये यांनी ऐन दुष्काळात लालबहादूर शास्त्री यांच्या नावाने बालवाडी सुरु करुन दहा विद्यार्थी घेऊन नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या कार्याचा प्रारंभ केला. कुपवाडच्या तळ्याच्या जागेवर शिक्षणाचा मळा फुलवला. याकामी माजी मुख्यमंत्री वसंतदादा व अंतुले यांनी मदत केली. विहीरीतील गाळ काढून महिलांना कपडे धुण्याची सोय करुन दिली. कुपवाडला बस सुरु केली. आज संस्थेत बालवाडी पासून दहावी पर्यंत सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या सर्व शाखांचे निकाल उत्कृष्ट आहेत.मुले शिष्यवृत्ती परीक्षा, क्रिडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा,संगीत शिक्षण, संस्कार क्षमता वृध्दी यामध्ये विद्यार्थी चमकतात.महाराष्टाच्या प्रगतीत नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे योगदान लक्षवेधी आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत खासगी शिक्षण संस्थांचे योगदान फार मोठे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या तरुणांना शिक्षणातून स्वातंत्र्याची प्रेरणा खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा महाविद्यालयांनी दिली आहे असे नमूद करुन कितीही मोठे झाला तरी संस्था, शाळा,गुरुजन, आई - वडील, गाव यांना विसरु नका असे आवाहन केले.
मंत्रमुग्ध करणारे सूत्रसंचालन कुंदन जमदाडे व सुनिता चौगुले यांनी केले. आभार सुप्रिया पाटील यांनी मानले. त्यानंतर आण्णासाहेब उपाध्ये यांनी शाळेतील सुसज्ज व अत्याधुनिक विज्ञान व भूगोल प्रयोगशाळा, संगीत शिक्षण वर्ग व वाद्ये दाखवली. त्यांनतर सर्व विद्यार्थ्यांनी संस्थेच्या सुग्रास भोजनाचा मनमुराद आनंद लुटला.
यावेळी अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये , उपाध्यक्ष सूरज आण्णासाहेब उपाध्ये,सचिव रितेश शेठ, संचालिका पूनम आण्णासाहेब उपाध्ये, बाळासाहेब कोथळे, प्रा. एस. ए. पाटील,प्राचार्या कांचन सूरज उपाध्ये, मुख्याध्यापक चिरमे, जमदाडे व रोझिना मॅडम, चौगुले सर, संस्थेच्या सर्व शाखांचा शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ,माजी मुख्याध्यापक व निवृत्त शिक्षक, हजारो विद्यार्थी व पालक आणि हितचिंतक उपस्थित होते.