yuva MAharashtra 'ते' निर्णय पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सरकारने घेतला होता - पृथ्वीराज पाटील

'ते' निर्णय पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सरकारने घेतला होता - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० डिसेंबर २०२
गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा दि. २१ जानेवारी २०११ रोजी मिरजेत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी सीसीएमपी कोर्स सुरु करण्याची प्रथम मागणी असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ होमिओपॅथी मेडिकल कॉलेजीस ऑफ महाराष्ट्राचा संस्थापक सचिव म्हणून मी केली आणि माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी तातडीने हा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात अहवाल देण्यासाठी कमिटी नेमली. त्या कमिटीत होमिओपॅथी डीन डॉ. कवेश्वरदादा व मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. भस्मे होते. सदर कमिटीने सीसीएमपी अभ्यासक्रम सुरु करण्याची शासनाला शिफारस केली व या कमिटीचा तो अहवाल कॅबिनेट मंत्रीमंडळात मंजूर करुन मा. राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने जी. आर काढण्यात आला असल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

हा अभ्यासक्रम प्रथम शासकीय व नंतर निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना लागू करण्यात आला. राज्यातील हजारो होमिओपॅथी डॉक्टर्संनी हा प्रमाणपत्र कोर्स उत्तीर्ण केला. परंतु या डॉक्टरांना एलोपॅथी औषधे खरेदी करणे व औषधोपचार प्रिस्क्रीप्शन देण्यात कायदेशीर अडचणी येत होत्या. सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टर्संना एलोपॅथी औषधोपचारासाठी पात्र समजणेचा शासन निर्णय होणे आवश्यक होते. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. भस्मे, डॉ. गोसावी व डॉ. रांजणेकर यांच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशनात १२ दिवस आम्ही उपोषण केले व हजारो होमिओपॅथी डॉक्टरांचा विधीमंडळावर मोर्चा काढून निवेदन दिले.


शासनाने आमच्या आंदोलनाची तातडीने दखल घेतली आणि दि. १३.८.२०१४ चा शासन जीआर काढून होमिओपॅथी डॉक्टर्संना एलोपॅथी औषधे खरेदी व प्रिस्क्रीप्शन देण्याचा हक्क दिला. याकामी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण, तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मोलाचे सहकार्य केले होते अशी माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली. 

 दि.२४.१२.२०२४ रोजी मा. आयुक्तसो औषध व अन्न प्रशासन यांनी जे परिपत्रक काढले आहे त्यामध्ये तत्कालीन महाविकास आघाडी शासनाच्या दि. १३.८.२०१४ च्या निर्णयाचा संदर्भही दिला आहे.या परिपत्रकात शेवटी सदर महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यावसायिक यांच्या औषध चिठ्ठीवर औषधांची विक्री करण्यापूर्वी त्यांचा नोंदणी क्रमांक व सीसीएमपी अर्हता प्राप्त केलेबाबतचा प्रमाणपत्र क्रमांक नमूद असल्याची खात्री करुनच सदर औषधांची विक्री करण्याची जबाबदारी ही किरकोळ औषध विक्रेत्यांची राहील हे निश्चित करण्यासाठी दि. २४.१२.२०२४ चे परिपत्रक काढल्याबद्दल आम्ही शासनाचे व मा. आयुक्तसो यांचे अभिनंदन करतो सध्याच्या महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिलच्या प्रशासकीय मंडळाने परिपत्रकाकरिता पाठपुरावा केला त्याबद्दल आभारी आहोत. 

आता या परिपत्रकामुळे कायदेशीर बंधनाबाबतचा संभ्रम दूर झाला आहे एवढेच. तथापि राज्यातील कांही वैद्यक व्यावसायिक होमिओपॅथी डॉक्टर्संना एलोपॅथी प्रॅक्टिस करण्याचा हक्क या परिपत्रकात आता दिला असल्याचा व्हाटसॲप, फेसबुक व समाजमाध्यमात चुकीची माहिती देत आहेत. होमिओपॅथी डॉक्टर्संना एलोपॅथी औषधोपचार हक्क दिल्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री मा. पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्या महाविकास आघाडी सरकारने सर्व पक्षीय संघटना, होमिओपॅथी डॉक्टर्स यांच्या आंदोलनामुळे २०१३ मध्येच घेतला होता. असेही पृथ्वीराज पाटील म्हणाले.