| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ डिसेंबर २०२४
महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आज राज्यपालांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक तसंच भाजप नेते विनोद तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन करण्यासंदर्भातील पत्र सुपुर्द केले.
याबाबतची पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की एकनाथ शिंदे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे यासंदर्भातील पत्र राज्यपालांना दिलं. मंत्रिपदाची शपथ कुणा-कुणाला दिली जाणार याची माहिती संध्याकाळीच दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. आपण आजपर्यंत तिघांनी मिळून सर्व निर्णय घेतले. त्यामुळे यापुढेही आपण एकत्रच निर्णय घेऊ असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं.
यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. त्यांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी यापुढेही ते सर्व निर्णय घेण्यासाठी आपल्याला सहकार्य करत राहतील. त्यांना मंत्रिमंडळात येण्याची विनंती केली आहे. तेही आपल्या सोबत असतील अशी आशा यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतील की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह असल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे.
याबाबत एकनाथ शिंदे यांना छेडले असता, त्यांनी पत्रकारांना सबुरीचा सल्ला देत म्हणाले की, अरे बाबांनो संध्याकाळपर्यंत थांबा सारं काही स्पष्ट होईल. पुढे ते म्हणाले की, महायुतीचं सरकार स्थापन करण्याची राज्यपालांना परवानगी मागितली. संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी होईल. अडीच वर्षापूर्वी देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावे म्हणून शिफारस केली होती. आज मी फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे शिफारसपत्र राज्यपालांना दिले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की, आपण भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला पूर्ण अधिकार दिले होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होत आहे. यापूर्वी महायुतीला असे मोठे बहुमत मिळालं नव्हतं. यावेळी ऐतिहासिक आणि दैदिप्यमान असा विजय मिळाला, आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो. मला काय मिळालं यापेक्षा, महाराष्ट्रातील जनतेला काय मिळालं हे महत्त्वाचं आहे, असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले की, आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिफारस करण्याची संधी मला मिळाली. त्यांना पूर्वीचाही अनुभव आहे. आता ते पुन्हा जोमानं काम करतील. यापुढेही त्यांना शुभेच्छा. तसंच देवेंद्र फडणवीस यांना यावेळी शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रपिदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सांभाळणार आहेत. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची भाजपा विधिमंडळ गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस उद्या सायंकाळी साडे पाच वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य आणि पत्रकारांना समोरीचा सल्ला देताना एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळपर्यंत थांबण्याचे केलेले वक्तव्य यावरून ते संध्याकाळी शपथ घेणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे.