yuva MAharashtra लोकराजा छ. शाहूंची कीर्ति सातासमुद्रापार पोहचविलेले दि. ब.अण्णासाहेब लठ्ठे..!

लोकराजा छ. शाहूंची कीर्ति सातासमुद्रापार पोहचविलेले दि. ब.अण्णासाहेब लठ्ठे..!


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ डिसेंबर २०२
आज ९ डिसेंबर.. दि.ब.आण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म दिन !

जैन समाजाला लठ्ठे यांच्या सारखे खमके नेतृत्व लाभले हे समाजाचे सद्भाग्य होय. करवीर संस्थानचे शिक्षणाधिकारी, दिवाण व पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द कमालिची गाजली व यशस्वी झाली. त्यांचे नेतृत्व केवळ जैन नव्हे तर बहुजन समाजमान्य झाले. लठ्ठे साहेबांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, वियार्थी, महिला उन्नती क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.

५०० कार्यकत्यांसह त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि काँग्रेस मंत्रिमंडळात मुंबई इलाख्याचे अर्थमंत्री होऊन त्यांनी सादर केलेल्या बजेटचे कौतुक ब्रिटीश पार्लमेंटमधे झाले ही घटना जैन समाजाची कॉलर ताठ करणारी आहे.

जैन टॅलेंटची ताकद काय असते हे त्यांच्या अफाट कार्यातून दिसून येते. त्यांचे दक्षिण भारत जेन सभेतील नेतृत्व जैन समाजाचे कोट कल्याण करणारे ठरले. आज जो जैन समाज आहे तो लठ्ठे साहेब व तत्कालीन असंख्य कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने दक्षिण भारत जैन सभेने घडविला आहे.

सत्यशोधक समाज परिषद, बेळगाव महानगर पालिका, मुंबई असेंब्लीत त्यांनी केलेल्या भरीव कामात सहकारी कार्यकर्त्यांनी त्यांना समर्थ साथ दिली होती. म्हणून त्यांच्या नेतृत्वाला दीर्घायुष्य लाभले.. लठ्ठे साहेबांचा कुशल संघटक व लोकप्रिय नेता म्हणून जी गुणवत्ता आहे ही आजच्या जैन व जैनेतर समाजालानिश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे.

  

लोकराजा छ. शाहू महाराजांचे मराठी चरित्र स्व. दि. ब. अण्णासाहेब लठ्ठे यांनी लिहिले आणि त्यांचे इंग्रजी चरित्र दोन खंडात लिहून त्यांना सातासमुद्रापार पोहोचविले हे अण्णासाहेब लठ्ठे यांचे महाराष्ट्र व मराठी मातीवरचे मोठे उपकार आहेत. अण्णासाहेब लठ्ठेकृत श्री शाहू-चरित्र या मथळ्याखाली बाबुराव जगतापांनी १९ व २६ जानेवारी व २ व १६ फेब्रुवारी १९२५ रोजी चार लेखांक लिहिले.पहिल्या लेखाकांत ते म्हणतात,' शाहू-चरित्रासारखा थोर ग्रंथ लिहून प्रो. आण्णासाहेबांनी महाराष्ट्रिया वर व विशेषतः ब्राम्हणेतर समाजावर अगणित उपकार करून ठेवले आहेत. हजारो लोक शाहू महाराजांच्या मागे वेड्यासारखे का लागले हे कोडे लठ्ठे यांनी लिहिलेल्या या पुस्कातून उलगडणार आहे.
  
लठ्ठे साहेबांनी द. भा. जैन सभेच्या माध्यमातून जैन समाजाचे भले केले हे समाजाचे सुदैव जरुर आहे, परंतु छत्रपतींच्या सहवासामुळे ते बहुजन समाज नेते म्हणून अधिक लोकमान्य झाले. छ. शाहू महाराजांच्या राजाश्रयामुळे जैन समाजातील कर्मवीर भाऊराव पाटील आणि अण्णासाहेब लठ्ठे या दोन बलाढ्य नेत्यांनी बहुजन समाज उध्दाराचे अवाढव्य काम केले. 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत लठ्ठे साहेबांनी हिंडलगा जेल मध्ये तुरुंगवासही भोगला होता.

 छ. शाहू महाराज, छ. राजाराम महाराज व छ. शहाजी महाराज या तिन्ही महाराजांच्या काळात त्यांनी अत्यंत इमानदारीने छत्रपतींची गादी आणि बहुजन समाजाची सेवा केली आहे.
एल्फिन्स्टन काॅलेज, मुंबई आणि राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे प्रोफेसर म्हणून ते विद्यार्थी प्रिय झाले.
करवीर संस्थानचे शिक्षणाधिकारी असताना साईक्स लाॅ काॅलेज व श्रीमती ताराराणी अध्यापक कॉलेज(बीटी काॅलेज) स्थापण्यात पुढाकार घेतला. कोल्हापूर म्युनिसिपल ऍक्ट लागू करुन संस्थान कारभार सुधारला. इलाखा पंचायतीची स्थापना करून लोकशाही कारभाराचा पाया मजबूत केला. कोल्हापूरचे रस्ते रुंद केले. छ.शाहू, प्रिन्स शिवाजी व आईसाहेब यांचे पुतळे उभारले.कोल्हापूर शहराचा चौफेर विकास घडवून आणण्यात लठ्ठे साहेब मास्टर माईंड ठरतात. 

जयसिंगपूर व्यापारी पेठ वसाहत स्थापनेची छत्रपतींना सूचना करून व्यापारीपेठ वसविली.
कोल्हापुरात लक्ष्मीपुरी व शाहुपुरी वसाहती वसविल्या. कोल्हापूर बँक, रत्नाकर बँक, महावीर बँक स्थापनेस उत्तेजना दिली. 
डेक्कन रयत साप्ताहिक सुरू करून संपादक झाले. सत्यशोधक समाज स्थापनेत अग्रेसर राहिले. छ. शाहू महाराजांचे दोन खंडात इंग्रजी चरीत्र लिहून लोकराजांना जगाच्या नकाशावर पोहचवले.
 
 प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांच्या आदेशानुसार छत्रपतींकडून बालविवाह बंदी कायदा करवून घेतला. 
आर्य समाजाकडून राजाराम कॉलेजची व्यवस्था काढून घेऊन काॅलेज संस्थानच्या ताब्यात घेतले व माधव ज्युलियन, ना. सि. फडके या विद्वान प्राध्यापकांच्या नेमणुका केल्या.

 कोल्हापूर नगरपालिका अध्यक्ष लोकनियुक्त केला. नगरपालिकेची अवाढव्य व देखणी इमारत उभी केली. नगरपालिकेचे ३०ते ३५ लाखाचे उत्पन्न १कोटीवर नेले. देवस्थान ट्रस्टचे उत्पन्न वाढविले. करवीर संस्थानमध्ये बजेटचा प्रारंभ केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वकिलीची सनद मिळवून दिली.
 लक्ष्मीपुरी राजाराम कॉलेजची सायन्स शाखा काढली. शिरोली बापट कँप येथून कोल्हापूर शहरासाठी पाणीपुरवठा योजना सुरू केली. शाहुपुरी व्यापारी संघटना स्थापन केली. शेतकी शाळा व शाहू मिल सुरू करण्यात पुढाकार घेतला.

 ते काँग्रेस पक्षाचे नेते होते. करवीर संस्थान दिवाण म्हणून उत्कृष्ठ कार्य केले बद्दल त्यांना त्यावेळी छत्रपतींनी रु.१०००० चे बक्षिस देऊन गौरविले होते. 

 ते मध्यवर्ती विधीमंडळात सदस्य व मुंबई असेंब्लीवर निवडून गेले होते. करवीर शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी संस्थान दौरा करून खेड्यापाड्यात शाळा सुरू करून शिक्षण प्रसार केला व बहुजन समाजातील मागास घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली,त्यांच्यामुळे करवीर संस्थांनमध्ये खेड्यापाड्यात प्राथमिक शिक्षणप्रसार झाला.

 भारताच्या घटना समितीवर त्यांना कोल्हापूर स्टेट तर्फे संधी मिळाली पण कार्यबाहुल्यामुळे त्यांनी ते नाकारले.. २१ मे१९३२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुणे येथे मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते.तसेच ते लंडन येथील गोलमेज परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची घनिष्ठ मैत्री होती. मागासवर्गीय समाजासाठी डॉ. आंबेडकर यांनी जसे कार्य केले तसे लठ्ठे साहेबांनी जैन समाजासाठी केल्याने त्यांना जैन समाजाचे आंबेडकर म्हणता येईल.

त्यांचा अफाट कामाची दखल घेऊन ब्रिटीश सरकारने ' रावबहादूर, छ. राजाराम महाराजांनी दिवाणबहादूर व छ शहाजी महाराजांनी त्यांना करवीररत्न पुरस्काराने सन्मानित केले
अकोला, मुंबई, बेळगाव,निपाणी, संकेश्वर, सातारा, दुधगांव येथील विविध संस्था, बॅंका, समाज व नागरिकांच्या वतीने त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता.

 दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने मुला.. मुलींची वसतिगृहे आणि शिष्यवृत्ती यांच्या माध्यमातून त्यांनी जैन समाज साक्षर केला.त्यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील जैन शेतकऱ्यांची मुले शिकून स्वाभिमानी व स्वावलंबी झाली. सा. प्रगती आणि जिनविजयच्या माध्यमातून जैन समाज प्रबोधनाचे ऐतिहासिक काम त्यांनी केले. ते गावोगावी जाऊन विविध विषयांवर व्याख्याने द्यायचे. ते प्रभावी वक्ता होते. जैन व बहुजन समाजात त्यांनी संघटन व वक्तृत्वाच्या जोरावर परिवर्तन घडवून आणले. त्यांनी सांगली, कोल्हापूर, निपाणी, बेळगाव येथील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविले.

 त्यांनी कोल्हापुरात अस्पृश्य विद्या प्रसारक मंडळ स्थापन केले होते. कोल्हापूर जैन बोर्डिंग तर्फे त्यांनी छ. शाहू महाराज व बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचा सत्कार केला होता. 

सुरेंन्द्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रागतिक परिषदेत राज्यकारभारात जातवार प्रतिनिधित्व मिळण्याचा ठराव लठ्ठे साहेबांनी पास करवून घेतल्याने बहुजनांचा राजकारणात प्रवेश होऊ शकला. 

१५०००शेतकऱ्यांची परिषद घेऊन शेतकरी हिताचे निर्णय घेतले त्यावेळी शेतकर्‍यांनी ४० बैल गाड्या जुंपून त्यांची मिरवणूक काढली होती.

 ते खादीधारी होते. छ. शिवाजी महाराज,छ .शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव होता.ते सत्यशोधकी होते. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना गुरुस्थानी मानत. त्यांनी प्राथमिक शिक्षणासाठी ग्रँट सुरू केली होती. 

राजगोपाल यांचे बरोबर त्यांनी भारतभर प्रवास केला होता. त्यांचे कार्यक्षेत्र व्यापक होते. अभिरुची सर्वगामी होती. प्रचंड विद्वत्तापूर्ण भाषणे, मुद्देसूद विचार मांडणी, कानडी, मराठी व इंग्रजीवरील प्रभुत्व, स्वच्छ आणि पारदर्शी कारभार, सत्यमार्गी आचरण, वकील, प्राध्यापक, संघटक, संपादक, धुरंधर राजकारणी, सल्लागार, साहित्यिक व समाजसेवक आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कार्य अजोड असे आहे .

 त्यांनी जगाची फेडरल राज्यघटना लिहिली,त्यांनी सात ग्रंथ लिहिले. ते मानवतावादी होते. 

त्यांच्या भरीव कार्याचे जिवंत स्मारक म्हणून द. भा. जैन सभेच्या तत्कालीन नेत्यांनी १९५१ मध्ये लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.. स्व. लठ्ठे साहेबांच्या चरित्राचा अभ्यास विशेष करून शिक्षकांनी करावा व त्यांचा प्रसार व प्रचार करून नव्या पिढीला लठ्ठे साहेब समजावून सांगणे आवश्यक आहे.

स्व.दिवाण बहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांची राजाराम काॅलेजमध्ये इंग्रजी, इतिहास व अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक असताना छ. शाहू महाराज आणि त्यांच्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत उपलब्ध करून देण्याची चर्चा झाली आणि करवीर संस्थान मध्ये त्याची अंमलबजावणी लठ्ठे यांच्या पुढाकाराने झाली, छ. शाहू महाराज त्यांच्या कामावर बेहद्द खुश झाले आणि त्यांची करवीर शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली.

 मागासवर्गीय मुलांना शिष्यवृत्ती, सवर्ण व मागासवर्गीय मुलांची एकत्रित शाळा, मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण, अस्पृश्यता पाळण्यावर बंदी, बालविवाह बंदी, लोकशाही शासन व्यवस्था इ. जे महत्वाचे निर्णय छत्रपतींने घेतले त्यासाठी लठ्ठे साहेबांचा सल्ला ऐतिहासिक स्वरुपाचा आहे.. स्व.लठ्ठे हे हे छ. शाहू महाराजांच्या काळात शिक्षणाधिकारी, छ. राजाराम महाराजांच्या काळात दिवाण म्हणजे मुख्य सचिव आणि छ. शहाजी महाराजांच्या काळात पंतप्रधान /मुख्य सल्लागार होते. 

तिन्ही छत्रपतींच्या काळात एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असतानाही त्यांनी एका पैचाही कधी गैरव्यवहार केला नाही.. स्वच्छ व पारदर्शी कारभार आणि सार्वजनिक क्षेत्रातील पदावर काम करताना मालक म्हणून नाही तर विश्वस्त म्हणून त्यांनी काम केले.. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे अर्थतज्ज्ञ होते.. तसाच अण्णासाहेबांचा अर्थशास्त्रज्ञ म्हणून लौकिक होता.. मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये या विद्वान अर्थतज्ज्ञांची विद्वत्ता स्पष्ट होते. जैन समाजात सार्वजनिक कार्याला प्रारंभ करुन निधनसमयी बहुजन समाज नेता म्हणून ख्यातीप्राप्त स्व. दि.ब.अण्णासाहेब लठ्ठे यांचे १६ मे १९५० रोजी निधन झाले आणि १३ जून १९५१ रोजी दक्षिण भारत जैन सभेच्या तत्कालीन नेत्यांनी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.दक्षिण भारत जैन सभा व लठ्ठे एज्युकेशन सोसायटी ही लठ्ठे साहेबांची जिवंत स्मारके आहेत. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीने लठ्ठे साहेब आणि छ.शाहू चरित्रावर प्रकाशित केलेला ग्रंथ वाचनीय आहे.यशवंत दादा मद्वाण्णा यांनी त्यांचे समग्र जीवन चरित्र लिहिले.महाराष्ट्राचे विचारवंत य. दि. फडके यांनी ३५ वर्षापूर्वी त्यांचे राजकीय चरित्र लिहिले आहे. त्यांच्यासारखे बहुआयामी नेते जैन व बहुजन समाजाला लाभत राहणं आवश्यक आहे. जैन समाजातील शिक्षकांनी लठ्ठे समजावून घेऊन त्यांना घराघरात पोहचवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मा. भालचंद पाटील यांनी सभेमार्फत केलेल्या आवाहनानुसार परतीची शिष्यवृती रक्कम त्यामध्ये स्वतःची भर घालून परत करणे व दक्षिण भारतजैन सभेचा आजीव सभासद व मुखपत्र प्रगतीचा वर्गणीदार होऊन लठ्ठे साहेबांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही काळाची गरज आहे
 
स्व. लठ्ठे साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..🙏

प्रा. एन. डी. बिरनाळे 
 सांगली
महामंत्री ( सांगली )
दभिण भारत जैन सभा
९ डिसेंबर, २०२४