yuva MAharashtra डिजिटल डिटेक्शनपासून व्हा सावधान! अपर महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांचे आवाहन !

डिजिटल डिटेक्शनपासून व्हा सावधान! अपर महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांचे आवाहन !


| सांगली समाचार वृत्त |
नाशिक - दि. ३ डिसेंबर २०२
इडी, सीबीआय, ॲण्टी करप्शन, कस्टमच्या नावाचा वापर करून सर्वसामान्यांच्या जमापुंजीवर डल्ला मारण्याची संधी सायबर भामट्यांना देऊ नका. सायबर भामटे वापरत असलेल्या डिजिटल डिटेक्शनपासून सावधान राहण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे. श्री. पाटील यांनी याबाबत आवाहन करणारी एक चित्रफित प्रसारित केली आहे. यामधून त्याने हे आवाहन केले आहे.

सायबर भामट्यांकडून आर्थिक फसवणुकीसाठी नवनवीन क्लृप्त्याचा वापर केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून सायबर भामटे हे सर्वसामान्यांना इडी, सीबीआय, ॲण्टी करप्शन, मुंबई वा दिल्ली क्राईम ब्रँच याचा विभागांचा नावाचा वापर केला जातो. सर्वसामान्यांकडून मोठ्या रकमा उकळण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात नांगरे-पाटील यांनी सावधगिरीचा इशारा देताना अशा भूलथापांना बळी न पडता त्यासंदर्भात नजीकच्या पोलिस ठाण्यांकडे संपर्क साधावा. अन्यथा सायबर पोर्टलच्या १९३० वा एनसीआरबी या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार दाखल करण्याचे आवाहनही नांगरे-पाटील यांनी केले आहे.

असा असतो सापळा

संशयित सायबर भामटे फोनवरून संपर्क साधून बँक खात्यावर मनिलॉड्रींग झाल्याचे, सीबीआयच्या हाती ड्रग्सजचे पार्सल आल्याचे, सेक्शुअल रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे, खोट्या एफआयआर यासह अनेक कारणे सांगत कारवाईला सामोरे जाण्यासाठी धमकावले जाते. याच दरम्यान ते सातत्याने संपर्क साधून समोरील व्यक्तीवर दबाव निर्माण करतात. बँकेसह विविध खात्यांमधून आर्थिक व्यवहार केल्याचे भ्रमित केले जाते. 


व्हिडिओ कॉल करताच, समोरील व्यक्तीवर ते डिजिटल डिटेक्शनचे जाळे टाकतात. संशयित सायबर भामट्याभोवती इडी-सीबीआय पोलिस वातावरण निर्मित केल्याने समोरील व्यक्तीला त्यावर विश्वास बसतो. त्यासाठी सायबर भामट्यांकडून मनी लॉड्रिंगचे बनावट कागदपत्रे, बनावट पार्सल, बँकांची माहिती यासह एफआयआर असे अनेक कागदपत्रे समोरील व्यक्तीला दाखविल्या जाऊन प्रकाराची सत्यता दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.

याच ठिकाणी सावज त्यांच्या जाळ्यात अडकते. सावज झालेल्या व्यक्तीचा मोबाईल हॅक करून त्याच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जाते. एकप्रकारे हाऊस अरेस्ट केले जाते. याचाच फायदा घेत अखेरचा डाव सायबर भामटे टाकतात, तो म्हणजे यातून सुटका करायची असेल तर तुमच्या बँक खात्यावरील पैशांची मागणी केली जाते. कारवाईपासून बचावापोटी समोरील व्यक्ती त्याची सारी जमापूंजी सायबर भामटे सांगतील त्या खात्यावर ऑनलाइन वर्ग केले जातात.

अशी बाळगावी सावधगिरी

- सायबर भामट्याचा अशारितीचा कॉल आल्यास घाबरून न जाता शांतपणे ऐकून घ्या

- स्वत:चे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात असतील तर स्वत: बँकेकडून खात्री करा वा नजीकच्या संबंधित कार्यालयात जाऊन चौकशी करा

- अन्यथा थेट नजिकचे पोलिस ठाणे, सायबर ठाण्यात जाऊन तक्रार करावी

- पैसे वर्ग झाले असतील तर २४ तासांत सायबर पोर्टल १९३० या क्रमांकावर वा एनसीआरबी (नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरो) यावर संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार करावी

- असे केल्यास हे पैसे तत्काळ फ्रिज केले जाऊ शकतात.