| सांगली समाचार वृत्त |
कवठे महांकाळ - दि. ५ डिसेंबर २०२४
आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या आभार दौऱ्यात सावळज (ता. तासगाव) येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. बुधवारी किरकोळ कारणावरुन सुरु झालेला वाद विकोपास गेला. एकमेकांना शिवीगाळ करीत अंगावर जाण्याचा प्रयत्न झाला. माजी उपसरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्याची अखंड गावासमोर हा प्रकार घडला.
विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील हे निवडून आले आहेत. निवडणुकीनंतर त्यांनी मतदारसंघात आभार दौरा सुरू केला आहे. बुधवारी सावळज, वायफळे, बिरणवाडी, यमगरवाडी यासह अन्य गावात त्यांचा आभार दौरा सुरू होता. दौऱ्याची सुरुवात सकाळी सावळजमधून झाली. सावळज येथील सिद्धेश्वर मंदिरात आमदार रोहित पाटील गावकऱ्यांचे आभार मानत होते. त्याचवेळी गावातील एक माजी उपसरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादीस सुरुवात झाली. सुरुवातीला दोघांमध्ये वादावादी झाली. नंतर हा वाद हातघाईवर गेला. एकमेकांना शिवीगाळ सुरु झाली. त्याचवेळी दोघांचेही भाऊबंद एकमेकांवर धावून गेले. भांडणात कॉलर धरल्यापर्यंत मजल गेली. यातूनच एकाच्या कानाखाली लगावल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आभार दौऱ्याला कुठेतरी गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी हे दोघेही रोहित पाटील गटाचे कार्यकर्ते असतानाही वेगवेगळे प्रचार करत होते. दोघांमधील वाद गेल्या काही दिवसांपासून धुमसत होता. हा वाद आज उफाळून आला. विकोपाला गेला. दुपारपासून सावळसह मतदारसंघात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात या घटनेबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.