| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ डिसेंबर २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीत मोठे इनकमिंग झाल्याचे दिसून आले होते. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीला एकामागे एक धक्के दिले होते. मात्र विधानसभेच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासाठी सोनेरी काळ सुरु झाल्याचे दिसून येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीगोंद्यातील माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. या पाठोपाठ आता अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचा बडा नेता गळाला लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची आज भेट घेतली आहे. अपूर्व हिरे हे या पूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटातच होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दादा भुसे यांच्या विरोधात अपूर्व हिरे यांचे बंधू अद्वय हिरे यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
अपूर्व हिरे घरवापसी करणार ?
अद्वय हिरे यांच्या प्रचार करण्यासाठी अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांचा पराभव केला. यानंतर आता अपूर्व हिरे यांनी मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अपूर्व हिरे राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता अपूर्व हिरे नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांचा प्लॅन बी यशस्वी होण्यास सुरुवात
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आणि विधानसभेला पराभूत झालेले राहुल जगताप यांच्या पाठोपाठ आता मानसिंग नाईक देखील अजित पवारांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. अजित पवारांनी निकालाच्या दिवसांपासून शरद पवार गटातील पराभूत आणि निवडून आलेल्या उमेदवाराना फोन करण्यास सुरुवात केली होती. अजित पवारांनी फोन केलेल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी अजित पवारांशी भेटून चर्चा केली आहे. यापैकी राहुल जगताप लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा प्लॅन बी यशस्वी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.