yuva MAharashtra सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटलला रविंद्र वळवडे यांच्या तक्रारीवरून प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका !

सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटलला रविंद्र वळवडे यांच्या तक्रारीवरून प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका !


फोटो सौजन्य : गुगल फोटो

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ डिसेंबर २०२
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे संलग्न असणाऱ्या सांगली आणि मिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये सांडपाणी आणि वैद्यकीय कचरा प्रक्रिया यंत्रणा नसल्याने हरित न्यायालयाने प्रत्येकी चार कोटी 62 लाख रुपये दंड केला आहे. याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन्ही दवाखाने बंद का करण्यात येऊ नयेत ? याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचिकाकर्ते रवींद्र वळवडे आणि उच्च न्यायालयातील वकील ॲड. ओंकार वांगीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 


दरम्यान या कारवाईमुळे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ माजलेली आहे. हरित न्यायालयाने केलेल्या कारवाईमुळे दोन्ही दवाखान्याचे अस्तित्व पणाला लागले असून शासन सांगली, मिरजेतील दवाखान्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कधी उभी करणार ? हरित न्यायालयाच्या कारवाई आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसला कसे सामोरे जाणार ? याबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी मात्र याप्रकरणी कार्यवाही सुरू झाली असून मिरजेला प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पार पडून कार्यादेश लवकरच मिळेल तसेच सांगलीसाठी साडेआठ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती पत्रकारांना दिली आहे.