yuva MAharashtra पहाटे पाचपर्यंत चालणार 'थर्टीफस्ट'ची रंगत: पोलिस यंत्रणा 'अलर्ट मोड'वर; भेसळीच्या दारूवर 'उत्पादन शुल्क'ची असणार नजर !

पहाटे पाचपर्यंत चालणार 'थर्टीफस्ट'ची रंगत: पोलिस यंत्रणा 'अलर्ट मोड'वर; भेसळीच्या दारूवर 'उत्पादन शुल्क'ची असणार नजर !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० डिसेंबर २०२
थर्टीफस्ट' म्हटलं की, सरत्या वर्षाला निरोप अन्‌ नववर्षाचे उत्साही स्वागत, तरुणाईकडून शहराबरोबरच ग्रामीण भागातही माळरानांवर पार्टीचा बेत, या बाबी नित्याच्याच. यंदा नववर्षाच्या स्वागताची रंगत पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व बार चालकांना पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला भेसळीच्या दारूवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. तसेच हुल्लडबाजांवर चाप लावण्यासाठी पोलिस दल 'अलर्ट' मोडवर आले आहे.

Sangli News : राज्यात द्राक्ष बागांचे नेमके क्षेत्र किती?; द्राक्ष संघ, कृषी विभागाच्या आकडेवारीत तफावत
रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, चौकाचौकांत नववर्षाच्या स्वागताचे संदेश लिहिले जातात. यंदा पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात आली आहे; तर वाईनशॉप रात्री एकपर्यंत खुले राहतील. एक दिवसाच्या परवान्यासह वार्षिक परवान्यांचेही वितरण करण्यात आले असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले. 'थर्टीफर्स्ट'च्या जल्लोषाचा व्यावसायिक लाभ उठवण्यासाठी हॉटेल, ढाबेचालकांनीही अनेक शकली लढवल्या आहेत. काहींनी ठराविक रकमेत पोटभर जेवण, ठराविक किमतीच्या मद्यावर स्नॅक व जेवणाच्या ऑफर्स दिल्या आहेत. दरम्यान, रंगाचा बेरंग करू नये, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे. थर्टीफस्टचे एन्जाय करा; पण नियमांचीही अंमलबजावणी करा, असे आवाहन करण्यात आले आहे.


प्रमुख चौकांत नाकाबंदी !

हुल्लडबाजांवर चाप लावण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह जिल्ह्यातील प्रमुख चौकात नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. संवेदनशील ठिकाणी अधिक बंदोबस्त तैनात असेल. याशिवाय पार्टीच्या ठिकाणीही पोलिसांची नजर राहणार आहे. जिल्हा विशेष शाखेने गोपनीय यंत्रणा आता सतर्क केली आहे.

थर्टीफस्ट'निमित्त जिल्ह्यातील बार चालकांना पहाटे पाचपर्यंत परवानगी असेल. तसेच वाईन शॉप चालकांना रात्री एकपर्यंत परवानगी राहणार आहे. याशिवाय भेसळीच्या दारूवर नजर ठेवण्यासाठी सहा भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नियमांची अंमलबजावणी करूनच 'थर्टीफस्ट'चा आनंद घ्या.
- प्रदीप पोटे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

नियमांची अंमलबाजवणी करूनच 'थर्टीफस्ट'चा आनंद घेतला पाहिजे. कोठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात येईल. तसेच हुल्लडबाजांवर कडक कारवाई केली जाईल.
- संदीप घुगे, पोलिस अधीक्षक, सांगली

तयारीवर एक नजर...

एक लाख विदेशी दारूचे परवाने वितरित

२५ हजार देशी दारूचे परवाने वितरित

जिल्ह्यातील गोपनीय यंत्रणा सतर्क

चौकाचौकांत नाकाबंदी

मद्यपान चाचणी यंत्र उपलब्ध

हुल्लडबाजांवर कडक कारवाई होणार