yuva MAharashtra 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मोठ्या ताकदीने लढणार' : निशिकांत भोसले-पाटील

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मोठ्या ताकदीने लढणार' : निशिकांत भोसले-पाटील


| सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - दि. ३ डिसेंबर २०२
विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव हा माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाला वेदना देणारा आहे, मात्र कोणी ही खचून जाऊ नका, तुम्हीच माझी ऊर्जा व आधार आहात, तुमचा माझ्यावर असलेला हक्क कायम असेल, तुमच्यासाठी माझा दरवाजा कायम खुला असेल. आपण ही निवडणुक मोठ्या धैर्याने लढली. यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण महायुती म्हणुन एकसंघपणे मोठ्या ताकदीने लढणार आहोत. आपण विकासाचे, विचाराचे राजकारण करणारे सेवक आहोत, त्यासाठी या क्षणापासून पुन्हा नव्याने लोकांच्यात जाऊन कामाला सुरुवात करु, असे मत इस्लामपूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर प्रकाश शैक्षणिक संकुलात महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची चिंतन बैठक बोलविण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सी.बी.पाटील हे होते. यावेळी आ.सदाभाऊ खोत, माजी आ. भगवान सांळुखे, हुतात्मा उद्योग समुहाचे युवा नेते गौरव नायकवडी, केदार पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, सनी खराडे, धैर्यशील मोरे, प्रसाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ.सदाभाऊ खोत म्हणाले, इस्लामपूर विधानसभा निवडणुकीकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते, ही लढाई मतदारांनी हातात घेतली होती, विजय निश्चित वाटत होता, मात्र काही भागात आपण कमी पडलो आणि आपला निसटता पराभव झाला, विरोधी उमेदवारांनी गुलालही लावला नाही, कारण त्याचा निसटता विजय हा त्यांचा पराभव आहे. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहाणार्‍यांकडे आमदार संख्या ही एका जीप गाडीत बसतील एवढी आहे, हे त्याचे मोठे अपयश आहे.


हुतात्मा संकुलाचे युवा नेते गौरव नायकवडी म्हणाले, हा मतदार संघ क्रांतीकारकांचा आहे, या निवडणुकीत सर्वसामान्य न्याय हक्कासाठी एका विचाराने लढला, क्रांती घडणार हा सर्वाना आत्मविश्वास होता, मात्र आपण यशाच्या रेषेपर्यत पोहचण्यासाठी थोडं कमी पडलो याची खंत आहे, भविष्यात परिवर्तनाचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण एका विचाराने अविश्रांत काम सुरु ठेवु.

सी.बी.पाटील म्हणाले, या मतदार संघातील झालेला पराभव नसून सर्वसामान्य,स्वाभिमानी मतदारांचा विजय आहे. आपण क्रांती घडविणारे मावळे आहात, आज जिंकला कोण यापेक्षा लढला कोण आणि कसा यावर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होऊ लागली आहे. सात ते आठ वर्षे प्रदेशाध्यक्ष व साडेसतरा वर्षे मंत्री असलेल्या नेतृत्वाचे कर्तृत्व काय तर दहा आमदार ,जे लोकसभेला स्वत:चे नामकरण सेनापती म्हणून केले त्यांचे या विधानसभेतील यशानंतर काय नामकरण करायचे ते त्यांचा आता पक्ष ठरवेल, आपल्या मतदार संघात क्रांतीला सुरुवात झाली आहे, आता आपण मागे फिरायचे नाही पुढे पुढे जात यशाचा ध्वज फडकूनच आपल्या तालुक्यातील अविचाराचे, व्देषाचे, कपटी राजकारण संपवायचे आहे. त्यासाठी आपण हातात हात घालून भविष्यात काम करु. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी स्वागत व प्रास्थाविक श्रीनिवास पाटील यांनी केले. यावेळी सागर खोत, माजी नगरसेवक एल.एन.शहा, सुभाष शिंगण, फारुख इबुशे, संजय बेले, अशोकराव खोत, मधुकर हुबाले, संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, रणजीत माने, शरद पाटील, संतोष घनवट, रवि पाटील, प्रमोद डांगे, राजेश मंत्री, सचिन सावंत, बबन पाटील, बाबा सांद्रे, राजाभाऊ पाटील, नाथगोंडा पाटील, दिलीप कुंभार, भरत साजणे, डाॅ.विजय चांदणे, संजय पोरवाल, उमेश घोरपडे, संजय हवलदार आदींसह अन्य मान्यवर,पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टोळ्यांचा समाचार

यावेळी बोलताना आष्टा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मयुर धनवडे म्हणाले, निवडकीच्या निकालानंतर काही पांढर्‍या कपड्यातील टोळ्या आष्टा शहरात फिरुन आपल्या कार्यकर्त्यांना म्हणतात तुमची नांवे वर कळविले आहेत, तुम्हाला अडचण होणार अशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्यातून होत आहे, पण त्यांना न पचणारा ठोस दिला आहे. यावर प्रविण माने म्हणाले, निशिकांतदादांचा मावळा घाबरणारा नाही,असली दहशत निर्माण करणाला जन्माला यायचा आहे आणि आला तर त्याला त्याचा त्याच भाषेत समाचार घ्यायला आम्ही खंबीर आहोत.