yuva MAharashtra जैन संस्कृतीला समर्पित अभयप्रभावन संग्रहालय ठरते जैन समाजाचे आकर्षण ! धार्मिक पर्यटकांची होतेय वाढती गर्दी !

जैन संस्कृतीला समर्पित अभयप्रभावन संग्रहालय ठरते जैन समाजाचे आकर्षण ! धार्मिक पर्यटकांची होतेय वाढती गर्दी !


फोटो सौजन्य : सांगली दर्पण, सांगली.

| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १३ डिसेंबर २०२
जैन तत्वज्ञान आणि भारतीय वारसा यांना समर्पित असलेल्या अभय प्रभावन या संग्रहालयाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. 50 एकर जागेत साडेतीन लाख चौरस फूट बांधकाम असलेले हे मावळ तालुक्यात असून इंद्रायणी नदीच्या निसर्गरम्य काठावर पारवाडी येथे ते उभारण्यात आले आहे.

जैन मूल्यांची सखोल समज निर्माण करणे, भारतीय मूल्य प्रणालीवर आणि समकालीन समाजात जैन मूल्यांची प्रासंगिकता यावर आधारित असलेले हे संग्रहालय अमर प्रेरणा ट्रस्टचे अध्यक्ष अभय फिरोदया यांनी निर्माण केले आहे. अन्न वस्त्र आणि निवारण आहे म्हणून सर्व काही छान होत नाही, आदर्श समाजासाठी संस्कार देखील तितकेच आवश्यक असतात. भारतीय संस्कृतीमध्ये जीवनमूल्ये आहेत. जगात प्रगती, संपन्नता आणि विकास येताना पाठोपाठ समस्या घेऊन येतात. त्यामुळे या सर्वांसोबत मूल्याधिष्ठित जीवन पद्धती हवी, तरच जीवन सुखी होईल. भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी अभय प्रभावांच्या माध्यमातून चांगल्या उपक्रमाचे उभारणी करण्यात आली आहे. हे केवळ संग्रहालय नाही, तर प्रेरणादायी स्थान असून ते ज्ञान केंद्र ठरेल. फिरोदिया यांनी केलेले काम पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.

असे आहे संग्रहालय...

अभय प्रभावन संग्रहालय हे अभ्यागतांना जैन धर्माच्या शिकवणींद्वारे भारतीय मूल्यांबद्दल माहिती देण्यासाठी उभारण्यात आले आहे. या संग्रहालयात ३५० पेक्षा अधिक अद्वितीय कलाकृतींसह ३० विशेषतः डिझाइन केलेल्या गॅलरी आहेत. ज्यातून सामाजिक स्तरावर सुरक्षा, उत्पादकता, समृद्धी आणि वैयक्तिक स्तरावर करुणा, मुक्त विचारसरणी आणि नैतिक जीवन या जैन मूल्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ५० एकर जागेवर पसरलेले हे संग्रहालय अद्ययावत ऑडिओ-व्हिज्युअल्स, अॅनिमेशन, व्हर्चुअल रिअॅलिटी आणि परस्परसंवाद प्रणालीने समृद्ध आहे. जैन तत्त्वज्ञानातील आध्यात्मिक संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी ३५० हून अधिक कलाकृती, शिल्पे आणि भव्य प्रतिकृती येथे तयार केल्या आहेत. या संग्रहालयात ३५ प्रोजेक्टर, ६७५ ऑडिओ स्पीकर्स आहेत.