yuva MAharashtra मराठी पत्रकार परिषदेतर्फे आज आरोग्य तपासणी शिबीर, सांगलीतील नामवंत डॉक्टरकडून मोफत उपचारही होणार !

मराठी पत्रकार परिषदेतर्फे आज आरोग्य तपासणी शिबीर, सांगलीतील नामवंत डॉक्टरकडून मोफत उपचारही होणार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ डिसेंबर २०२
पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाने मंगळ्वार दि. ३ डिसेंबर रोजी येथील आयएमए हॉल, आमराई जवळ, सांगली येथे पत्रकार, पत्रकारितेतर कर्मचारी, वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यभर अशा प्रकारे परिषदेने पत्रकार आरोग्य दिन आयोजित केले असून दहा हजाराहून अधिक पत्रकार व कुटुंबियांची तपासणी होत आहे अशी माहिती सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कोळी यांनी दिली.

सांगली येथे सकाळी ८ ते १२ या वेळेत सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या तपासणी आणि मोफत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या व आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता रक्त तपासणी, साखर तपासणी सर्व रोग निदान, उपचार शिबिर सुरू होणार आहे.

या होणार तपासण्या

या शिबिरात हृदयासंबंधी लिपिड प्रोफाईल, सीबीसी, थायरॉईड तपासणीसहित रक्ताशी संबंधित बहुतांश तपासण्या होणार आहेत. शिवाय इसीजी, आवश्यकता भासल्यास टू डी इको, अँजिओग्राफी, सिटी स्कॅन, एमआरआय तपासणी गोफत करण्यात येणार आहे.

शिबिराच्या ठिकाणी फिजीशिअन, अस्थिरोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, दंत शल्य चिकित्सक, नेत्ररोग तज्ञ, आहारतज्ञ असे आवश्यक ते सर्व तज्ञ उपलब्ध असणार आहेत. महिलांच्यासाठी आवश्यक मेमोग्राफीसाठी नाव नोंदणीही यावेळी केली जाईल. शिवाय ज्यांना जे उपचार आवश्यक असतील ते मोफत करण्याची व्यवस्था सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पुढाकाराने करण्यात येणार आहे. यात डोळ्यांच्या शस्त्रक्रियाही आहेत.


आठ दिवसात संपूर्ण जिल्हाभर शिबिरे

सांगली येथे ३ रोजी होणारे शिबिर जिल्हयातील सर्व तालुक्यात तालुका पत्रकार संघाच्या पुढाकाराने उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांची उपलब्धता आहे, त्याठिकाणी करण्यात येणार असून तेथेही ज्या पत्रकार व कुटुंबियांच्या आरोग्याबाबत दोष आढळतील त्यांच्यावर मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहितीही अविनाश कोळी यांनी दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा पत्रकार संघ व डिजीटल मिडीया परिषदेचे सदस्य प्रयत्न करत आहेत. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.