| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. १८ डिसेंबर २०२४
गेल्या जवळजवळ पन्नास वर्षापासून सांगलीकरांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या शेरीनाल्याचा प्रश्न मार्गी लागला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना हा प्रकल्प पूर्ण करण्याचे अभिवचन दिले आहे. सांगली महापालिकेने शासनाकडे 93.51 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासह महापालिका क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेच्या नकाशांचा ही प्रश्न या निमित्ताने मार्गी लागणार आहे.
सध्या नागपूर येथे महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच दरम्यान सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शरीराच्या सांडपाण्यामुळे कृष्णा नदीचे होणारे प्रदूषणाकडे लक्ष वेधले व सांगलीकर नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेला हा गंभीर प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. तेव्हा फडणवीस यांनी हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले.
प्रदूषण रोखण्यासाठी धुळगाव योजना राबविण्यात आली आहे. मात्र पावसाळ्यात अथवा जेव्हा पाण्याची फारशी गरज नसते तेव्हा शेरीनाल्याचे अशुद्ध पाणी कृष्णा नदीत मिसळून ती प्रदूषित होते. या प्रदूषणामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईने महापालिकेला यापूर्वी कोट्यावधी रुपयांचा भुर्दंडही बसला आहे.
या सर्वांचा विचार करून शरीरातील अशुद्ध पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 93.51 कोटी रुपयांचा प्रस्ताव सांगली महापालिकेतर्फे सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्रहक्काने याबाबत पुढाकार घेऊन हा प्रस्ताव मंजूर करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शेरीनाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे.
दरम्यान हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी आ. सुधीरदादा गाडगीळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निकालाबद्दल सांगलीकर नागरिकाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.